
रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी हरवलेले आणि चोरीस गेलेले मोबाईल १८७ शोधून मालकांच्या स्वाधीन केले
रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी हरवलेले आणि चोरीस गेलेले मोबाईल शोधून काढण्याच्या मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. मार्च २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या काळात हरवलेल्या १८७ मोबाईल फोनचा यशस्वी शोध घेवून ते मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
मंगळवार दि. २४ नोव्हेंबर रोजी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे (भा.पो.से.) यांच्या हस्ते सर्व मोबाईल फोनची अधिकृतरित्या मालकांना परतफेड करण्यात आली. ही मोहीम रत्नागिरी पोलीस अधिक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अप्पर पोलीस अधिक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या काळात रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, पोशि/९८८ अजिंक्य ढमढेरे, तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील अंमलदारांनी समन्वयाने काम करून मोबाईल शोध मोहीम गतिमान केली.
सायबर सेलच्या तांत्रिक तपासणी, ट्रेकिंग आणि इतर माहितीच्या आधारे १८७ मोबाईल फोन शोधण्यात यश आले. कार्यक्रमादरम्यान संजय दराडे यांनी नागरिकांना सायबर गुन्ह्यांबाबत जागरूक राहाण्याचे आवाहन केले. सायबर फसवणूक किंवा ऑनलाईन गुन्हा झाल्यास तत्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे मार्गदर्शनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी निलेश माईनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा सुरेश कदम, तसेच मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी वा कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांच्या हरवलेल्या वस्तूंचा शोध घेण्याबाबत रत्नागिरी पोलिसांचा हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरत असून, जिल्ह्यात पोलिसांबद्दल विश्वास आणि सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.www.konkantoday.com




