भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरी आणि इन्फिगो आय केअर यांच्यात जवानांसाठी नेत्र उपचार सेवांसाठी सामंजस्य करार..


रत्नागिरी : तटरक्षक दलातील सेवारत जवानांखेरीज, संरक्षण मंत्रालयाच्या सर्वच सैन्य दलातील आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्यसेवेला बळकटी देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीने काल (२३ ऑक्टोबर) रोजी आपल्या कार्यालयात इन्फिगो आय केअर हॉस्पिटल यांच्याशी माफक दरात नेत्र उपचार सेवांसाठी सामंजस्य करार (एमओयू) केला आहे.
या करारामुळे इन्फिगो आय केअर हॉस्पिटल हे भारतीय सशस्त्र दलाच्या सैन्य समुदायासाठी नेत्ररोगांसंबंधी तज्ज्ञ सल्ला, निदान सेवा आणि सुपरस्पेशालिटी उपचार उपलब्ध करून देणारे संस्थान बनले आहे. इन्फिगो आय केअर हॉस्पिटलसोबत केलेला हा करार केवळ रत्नागिरी शहरापुरता मर्यादित नसून, हॉस्पिटलच्या खेड, मुंबई आणि इतर केंद्रांपर्यंत विस्तारला आहे. यामुळे संरक्षण मंत्रालयातील सर्वच सेना दलातील कार्यरत व सेवानिवृत्त जवान, असैनिक कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांना नेत्रतज्ज्ञांचा सल्ला, निदान सेवा व उपचार केंद्र सरकार स्वास्थ्य योजनेच्या माफक दरात उपलब्ध होतील.

हा करार भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीचे कमांडिंग ऑफिसर कमांडंट शैलेश गुप्ता आणि इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांच्या दरम्यान करण्यात आला. या स्वाक्षरी समारंभास तटरक्षक दलाचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कमांडंट (क श्रे) दिनेश टामटा, स्टेशन वैद्यकीय अधिकारी सर्जन लेफ्टनंट कमांडर गोपन जी जे आणि इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी मंगेश पावसकर हेही उपस्थित होते.

हा सामंजस्य करार फक्त एक औपचारिक करार नसून, नागरी आणि सैन्य यांच्यातील एकत्रित आरोग्यसेवा व्यवस्थेची उभारणी करण्याचा एक दृढ संकल्प दर्शवितो. हा करार नागरी-सैन्य आरोग्य सहकार्याचे एक आदर्श उदाहरण निर्माण करील आणि इतर शहरांमधे देखील अशा स्वरूपाच्या भागीदारीस प्रोत्साहन मिळेल आणि सशस्त्र दलांच्या सर्वांगीण आरोग्यसेवेच्या उद्दिष्टास हातभार लागेल.

भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरी हे केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखालील कोकणातील एक प्रमुख तटरक्षक कार्यालय असून त्याच्या कार्यक्षेत्रात रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे किनारपट्टीचे जिल्हे येतात. याची आगामी काळातील देशातील तटरक्षक दलाचे एक मोठे व परिपूर्ण तळ बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button