
‘लोकसंवाद’ अतिशय स्तुत्य उपक्रम; शासनाच्या योजना थेट जनतेच्या दारात: पालकमंत्री डॉ. उदय सामंतगणेशोत्सवाच्या माध्यमातून राबविलेल्या जनजागृती मोहिमेचे पालकमंत्र्यांकडून कौतुक; प्रसिद्धी अहवाल सादर
*रत्नागिरी, दि. १५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा माहिती कार्यालयाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या सहकार्याने राबविलेला ‘लोकसंवाद’ हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे. याद्वारे शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती थेट सर्वसामान्यांच्या दारात पोहोचली आहे, असे मनोगत उद्योगमंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केले.
‘लोकसंवाद’ उपक्रमांतर्गत मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि समाजमाध्यमांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादावर आधारित एकत्रित सर्वसमावेशक प्रसिद्धी अहवाल जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी नुकताच पालकमंत्री डॉ. सामंत यांना सादर केला. हा अहवाल स्वीकारताना डॉ. सामंत यांनी जिल्हा माहिती कार्यालयाच्या कल्पकतेची आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जनहितैषी भूमिकेची मनापासून प्रशंसा केली.
गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाचे औचित्य साधून १६ ते २४ सप्टेंबर या कालावधीत हा व्यापक उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात आला. या मोहिमेत महारोजगार मेळावे, सेवा संकल्प अभियान, एसआयआर मोहीम, नवमतदार व महिला मतदार नोंदणी वाढविणे, आरोग्याचा जागर, सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती, कृषी योजनांचा ‘महाविस्तार जागर’, मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम, महिला शेतकरी प्रमाणपत्र व सन्मान योजना, तसेच ध्वनिप्रदूषण रोखणे आणि प्लास्टिकमुक्त गाव यांसारख्या सामाजिक व लोकोपयोगी योजनांचा संदेश सार्वजनिक गणेश मंडळांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्यात आला. विशेष सेवा शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना योजनांचा थेट लाभ कसा मिळवता येईल, याचेही प्रभावी मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
या उपक्रमाला जिल्ह्यातील वृत्तपत्रे, दूरचित्रवाहिन्या आणि डिजिटल माध्यमांनी व्यापक प्रसिद्धी देत मोलाची साथ दिली. माध्यमांच्या या सकारात्मक आणि जबाबदार भूमिकेचाही पालकमंत्र्यांनी गौरव केला. जनसामान्यांच्या हितासाठी आणि विकासाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय भविष्यातही अशाच ऊर्जादायी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची मालिका सुरू ठेवेल, असा विश्वास व्यक्त करत डॉ. सामंत यांनी संपूर्ण यंत्रणेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




