दिवाळी फराळाचा स्वाद आता सातासमुद्रापार! टपाल विभागाची परदेशात पार्सल पाठवण्याची विशेष सेवा; घरबसल्या ‘फ्री-पिकअप’ सुविधेचाही लाभ

रत्नागिरी, दि १८ ): दिवाळी हा केवळ दिव्यांचा आणि प्रकाशाचा सण नसून तो नात्यांमधील आपुलकी, जिव्हाळा आणि गोडवा अधिक दृढ करण्याचा मंगल उत्सव आहे. शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायानिमित्त घरापासून दूर सातासमुद्रापार गेलेल्या आपल्या प्रियजनांना सणासुदीच्या दिवसांत घरच्या फराळाची आठवण व्याकुळ करते. हीच उणीव भरून काढण्यासाठी आणि परदेशात राहणाऱ्या आपल्या आप्तेष्टांना घरच्या रुचकर फराळाची गोडी चाखता यावी यासाठी भारतीय टपाल विभागाने परदेशात फराळाची पार्सल्स पाठवण्याची विशेष व सुलभ सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनाही या अत्यंत उपयुक्त आणि कौतुकास्पद उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे.
नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशात स्थायिक झालेल्या आपल्या नातेवाइकांपर्यंत दिवाळीचा फराळ पोहोचवण्यासाठी दरवर्षी नागरिकांची मोठी धावपळ होत असते. परंतु आता टपाल विभागाच्या या विश्वासार्ह सेवेमुळे परदेशात वसलेल्या मराठी माणसांना घरच्या खमंग चकल्या, चवदार करंज्या, खुसखुशीत लाडू आणि चविष्ट चिवड्याची अस्सल चव अगदी सहज अनुभवता येणार आहे.
नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांचा वेळ वाचावा यासाठी पोस्ट विभागाने यंदा आणखी एक आधुनिक पाऊल उचलले आहे. या अंतर्गत शहरातील मिठाई दुकानदार तसेच सर्वसामान्य नागरिकांना घरबसल्या पार्सल पाठवता यावे म्हणून थेट ‘फ्री-पिकअप’ सेवा सुरू करण्यात आली आहे. ज्या नागरिकांना पोस्टामार्फत परदेशात फराळ पाठवायचा आहे, त्यांनी ८६६९९१९८६० (8669919860) या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा आपल्या जवळच्या पोस्ट कार्यालयात संपर्क साधल्यास पोस्टाचे कर्मचारी थेट तुमच्या घरावरून किंवा दुकानातून पार्सल स्वीकारणार आहेत.
परदेशात खाद्यपदार्थ पाठवताना सुरक्षित पॅकिंग आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक असते. टपाल विभागामार्फत सर्व नियम व निकषांनुसार पार्सल सुरक्षितपणे स्वीकारून पुढील प्रवासासाठी रवाना केले जाते. या पार्सलचा दर संबंधित देश, पार्सलचे वजन आणि लागू असलेले टपाल शुल्क यांनुसार ठरवला जाणार असून, नागरिकांनी पार्सल पाठवण्यापूर्वी संबंधित देशातील खाद्यपदार्थ आयातीचे नियम समजून घेणे आवश्यक आहे.
“परदेशात राहणाऱ्या आपल्या माणसांपर्यंत घरच्या प्रेमाचा आणि फराळाचा गोडवा पोहोचवणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन यंदा आम्ही या सेवेचा विस्तार केला आहे. तरी रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या नजीकच्या पोस्ट कार्यालयाशी संपर्क साधून या सुविधेचा लाभ घ्यावा आणि सातासमुद्रापार दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा,” असे आवाहन रत्नागिरी विभागाचे डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button