सिंधुदुर्गात पहिल्यांदाच आढळला पांढरा मण्यार! कुडाळ तालुक्यातील पावशी गावातील दुर्मिळ घटना


सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समृद्ध जैवविविधतेत सर्पविश्वातील एक अत्यंत दुर्मीळ आणि लक्षवेधी नोंद झाली आहे. जिल्ह्यात प्रथमच कुडाळ तालुक्यातील पावशी गावातून पांढऱ्या रंगाच्या ‘अल्बिनो मण्यार’ या सापाची नोंद करण्यात आली आहे.सर्पमित्र अनिल गावडे आणि प्राणी अभ्यासक डॉ. योगेश कोळी यांनी या सापाची नोंद केली. कुडाळ वनक्षेत्रपाल चेतन पाटील व वनपाल श्री. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या दुर्मीळ सापाचे सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले. या घटनेमुळे सिंधुदुर्गातील सर्पविविधता आणि त्यातील अनोख्या रंगविविधतेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.
सामान्यतः मण्यार हा काळसर किंवा निळसर-काळसर रंगाचा असून त्याच्या शरीरावर पांढऱ्या रंगाचे अरुंद आडवे पट्टे असतात. पाठीवरील मध्यवर्ती रांगेतील मोठे षटकोनी आकाराचे खवले, गुळगुळीत शरीरावरील खवले, लहान डोके आणि तुलनेने लहान डोळे ही त्याची महत्त्वाची ओळख वैशिष्ट्ये आहेत.

मात्र अल्बिनो अवस्थेत शरीरातील रंगद्रव्याची निर्मिती अत्यंत कमी किंवा अनुपस्थित असल्यामुळे सापाचा नेहमीचा काळा रंग दिसून येत नाही. पूर्ण अल्बिनो मण्यार सापांमध्ये डोळे लालसर दिसतात.
मण्याराचे शास्त्रीय नाव बुंगारस कॅरुलियस (Bungarus caeruleus) असून तो इलापिडी या विषारी सापांच्या कुळातील आहे. मण्यार हा प्रामुख्याने रात्री सक्रिय असणारा साप आहे. दिवसा तो दगडाखाली, लाकडाच्या ढिगाऱ्याखाली, घराभोवतीच्या अंधाऱ्या जागेत, बिळांमध्ये किंवा इतर सुरक्षित ठिकाणी लपून राहतो. रात्रीच्या वेळी ते अन्नाच्या शोधात बाहेर पडतात.सापाचे रेस्क्यू केल्यानंतर नागरिकांमध्ये निर्माण होणारी भीती आणि गैरसमज दूर करून त्यांची सुरक्षित सुटका करणे अत्यंत महत्त्वाचे असते. सर्पमित्र अनिल गावडे यांनी प्रसंगावधान राखत समाजामध्ये जनजागृती केली. सापांना मारण्याऐवजी त्यांचे सुरक्षितपणे रेस्क्यू करून त्यांना योग्य अधिवासात सोडण्याच्या कार्यात सर्पमित्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button