
धूर, खिडक्यांमधून उड्या अन् आरडाओरड, यमुना एक्सप्रेसवेवर बसला भीषण आग; ९ जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी!
9 people killed and many injured in fire : यमुना एक्सप्रेसवेवर खासगी प्रवासी बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ग्रेटर नोएडा येथे गुरुवारी पहाटे लागलेल्या या आगीत ९ जण ठार झाले असून अनेकजण जखमी झाले आहेत. बसला आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
खिडक्यांमधून उड्या मारून वाचवला जीव
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ही बस दिल्लीहून महोबाकडे जात असताना अचानक आग लागली. आग लागली त्यावेळी बहुतांश प्रवासी गाढ झोपेत होते. आगीमुळे प्रवाशांची एकच तारांबळ उडाली आणि अनेक प्रवाशांनी बसच्या खिडक्यांमधून बाहेर उड्या मारून आपला जीव वाचवला. दरम्यान, काही जण आत अडकले होते.
बचाव पथक घटनास्थळी
एक्सप्रेसवेच्या बाजूला बसला आग लागली आणि काही क्षणातच आगीने संपूर्ण बसला वेढले. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. जखमींना मदत करण्यासाठी आणि मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचावकार्य राबवण्यात आले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेत, अपघातात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केला.
प्रवाशी काय म्हणाले?
बसमधील एका महिला प्रवाशाने या घटनेची माहिती एएनआयला देताना सांगितले की, “मी झोपेत होते तेव्हा कोणीतरी दरवाजा ठोठावला. मला जाग आली, तेव्हा तिथे आधीच मोठी गर्दी जमली होती; मी सामान न घेता बाहेर पडले, फक्त फोन घेतला. इतकी गर्दी होती की लोक एकमेकांना धक्काबुक्की करत होते. मलाही मागे-पुढे ढकलले गेले आणि शेवटी एकाने मला ओढून बाहेर काढले. त्यानंतर मला काहीही आठवत नाही.”
धूर, धक्काबुक्की
“सर्वत्र धूर झाला होता, सगळीकडे गोंधळाची परिस्थिती होती, आणि बाहेर पडणे अत्यंत कठीण झाले होते. तिथे इतका धूर होता की काहीच दिसत नव्हते; लोक आतमध्ये गुदमरत होते. खूपच कमी लोकांना तिथून बाहेर पडण्यात यश आले, फक्त तेच लोक बाहेर पडू शकले ज्यांना धक्काबुक्कीमधून मार्ग काढता आला. अनेकांचा मृत्यू झाला. माझ्या मागे बरेच लोक होते जे कदाचित बाहेर पडू शकले नाहीत, कारण मीच खूप उशीरा बाहेर पडले,” असे या महिला प्रवाशाने एएनआयशी बोलताना सांगितले.




