
मिरजोळी–चिपळूण मार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवास धोकादायक; तातडीने दुरुस्तीची मागणी
चिपळूण : गुहागर–चिपळूण मार्गावरील मिरजोळी-साखरवाडी येथील नायरा पेट्रोल पंपाजवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रहिमान दलवाई यांनी केली आहे.
दलवाई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहनधारकांकडून रोड टॅक्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर महसूल गोळा केला जात असतानाही रस्त्यांची गुणवत्ता समाधानकारक नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
मिरजोळी-साखरवाडी परिसरातील खराब रस्त्यामुळे दुचाकीस्वार, चारचाकी चालक, पादचारी तसेच रुग्णवाहिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात खड्डे पाण्याखाली जात असल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता अधिक वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या मार्गावर कोणतीही मोठी जीवितहानी होण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दर्जेदार दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत. तसेच केवळ तात्पुरत्या डागडुजीवर भर न देता टिकाऊ स्वरूपाचे रस्ते उभारावेत आणि निकृष्ट काम करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
नागरिकांच्या जीविताची सुरक्षा ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी असून अपघातप्रवण ठिकाणांची त्वरित दुरुस्ती करणे ही काळाची गरज असल्याचे दलवाई यांनी निवेदनात म्हटले आहे.




