
अडीच कोटींच्या कळकवणे पुलाला मोठा खड्डा; वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण
चिपळूण तालुक्यातील कळकवणे-आकले-तिवरे मार्गावरील वाशिष्टी नदीवरील कळकवणे येथील पुलाला मोठा खड्डा पडल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने सन २०२२ मध्ये सुमारे अडीच कोटी रुपये खर्चास मंजुरी दिल्यानंतर बांधण्यात आलेल्या या पुलाच्या बांधकामाच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सदर पूल ठेकेदार श्री. एस. एम. चिपळूणकर यांनी बांधलेला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. सायंकाळच्या सुमारास पुलावर मोठा खड्डा पडल्याचे निदर्शनास आले. यावेळी कळकवणे गावातील ग्रामस्थ एम. डी. शिंदे, विकास शिंदे, महेंद्र शिंदे, प्रवीण शिंदे, कदम, बापू गमरे आदींनी घटनास्थळी पाहणी केली.
खड्डा निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना खबरदारीचा इशारा दिला. तसेच वाहतूक सुरळीत राहावी यासाठी प्रयत्न केले. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, आगामी काही दिवसांत गणरायाचे आगमन होणार असून, गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने गावाकडे येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पुलावरील खड्डा धोकादायक ठरू शकतो.
या घटनेकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन पुलावरील पडलेला खड्डा तात्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी कळकवणे ग्रामस्थांनी केली आहे. पुलाच्या बांधकामाला अद्याप काही वर्षेच उलटली असताना अशी परिस्थिती निर्माण झाल्याने बांधकामाच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची मागणीही होत आहे.




