
हर्णे किनाऱ्यावर मृतावस्थेत डॉल्फिन; वन विभागाकडून पर्यावरणपूरक विल्हेवाट
दापोली तालुक्यातील हर्णे बायपास समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी (१८ जुलै) सकाळी सुमारे एक ते दीड वर्षांचा नर डॉल्फिन मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर मृत डॉल्फिनची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.
वन विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित डॉल्फिन भरकटून किनाऱ्यावर आला असावा. त्यानंतर खडकावर आदळल्यामुळे त्याच्या पोटाजवळ आणि मानेवर गंभीर दुखापत झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
वनरक्षक प्रभू साबणे आणि वनरक्षक विश्वंभर झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मृत डॉल्फिनची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी हर्णे कांदळवन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फहद जमादार, कासवमित्र दुर्गेश जाधव, सुरक्षारक्षक नदीम महाडिक, मुजम्मील काझी, ग्रामपंचायत सदस्य सना काझी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
वन विभागाने नागरिकांना समुद्रकिनाऱ्यावर कोणताही सागरी जीव मृत किंवा जखमी अवस्थेत आढळल्यास त्याला स्पर्श न करता तात्काळ वन विभागाला माहिती देण्याचे आवाहन केले आहे.



