
रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत १०० सुरक्षा रक्षक नेमण्यास मंजुरी
रत्नागिरी : प्रवाशांची सुरक्षितता आणि वाढत्या रेल्वे वाहतुकीचा ताण लक्षात घेता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत तातडीने १०० सुरक्षा रक्षक घेण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस अंमलदारांची रिक्त पदे भरून त्यांचे प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत ही तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय गृह विभागाने नुकताच जारी केला आहे.
नियोजित रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाण्याची हद्द रोहा रेल्वे स्थानक ते राजापूर रोड रेल्वे स्थानकापर्यंत पसरलेली असून, या तब्बल ३७ रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेची जबाबदारी या ठाण्यावर आहे. सध्या या मार्गावरून दररोज ७० प्रवासी ट्रेन आणि ४० मालवाहू ट्रेन धावत आहेत. नोकरी, व्यवसाय आणि पर्यटनाच्या निमित्ताने मुंबई महानगर क्षेत्रात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे.
वाढते शहरीकरण आणि नव्याने होणारे रेल्वे टर्मिनस यामुळे कोकण रेल्वेवरील ताण सातत्याने वाढत चालला आहे. या प्रचंड कार्यक्षेत्राच्या आणि वाहतुकीच्या तुलनेत सध्या रत्नागिरी येथे उपलब्ध असलेले पोलीस मनुष्यबळ अपुरे पडत होते. त्यामुळे हे नवीन लोहमार्ग पोलीस ठाणे पूर्ण क्षमतेने सुरू करणे आणि कायदा व सुव्यवस्था राखणे कठीण झाले होते.
या समस्येवर उपाय म्हणून, पोलीस आयुक्त (लोहमार्ग, मुंबई) यांनी शासनाकडे सुरक्षा रक्षक पुरवण्याची विनंती केली होती. त्यास अनुसरून वित्त विभागाच्या उपसमितीने केलेल्या शिफारशीनुसार गृह विभागाने ही मंजुरी दिली आहे. हे १०० सुरक्षा रक्षक १२ जूनपासून पुढील २ वर्षांसाठी किंवा नियमित पोलीस मनुष्यबळ उपलब्ध होईपर्यंत (यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत) कंत्राटी तत्त्वावर तैनात केले जाणार आहेत.
या बाबीसाठी येणारा सर्व खर्च चालू आर्थिक वर्षाच्या मंजूर अनुदानातून कंत्राटी सेवा या लेखाशीर्षांतर्गत केला जाईल. या प्रक्रियेसाठी पोलीस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. या तात्पुरत्या नियुक्तीमुळे रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाणे तातडीने पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यास मदत होणार असून कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि चिंतामुक्त होणार आहे.




