
मुलीला पुण्याला MBA ला सोडलं, निरोप दिला अन् त्या अपघाताने समृद्धी महामार्गावर अख्खं कुटुंब क्षणात संपलं
वडिलांच्या डोळ्यांत मुलीच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने होती… आईच्या मनात मुलीच्या नव्या आयुष्याची काळजी होती…आणि संपूर्ण कुटुंब मुलीला पुण्यात ‘एमबीए’ला प्रवेश मिळाल्याचा आनंद साजरा करत होते. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते. मुलीला महाविद्यालयात सोडून वर्ध्याकडे परतणाऱ्या कुटुंबावर समृद्धी महामार्गावर काळाने असा घाला घातला की एका क्षणात चार जणांचा जीव गेला. पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वीरूळ इंटरचेंजजवळ कारला भरधाव आयशर ट्रकने दिलेल्या भीषण धडकेत एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून, या घटनेने संपूर्ण वर्धा जिल्हा हादरून गेला आहे.
राजेश टिपले यांना दोन जुळ्या मुली… दोघींवरही पालकांचे अपार प्रेम. त्यापैकी एका मुलीला पुण्यात एमबीएला (MBA) प्रवेश मिळाला. मुलीच्या आयुष्यातील हा मोठा टप्पा साजरा करण्यासाठी आणि तिला महाविद्यालयात सोडण्यासाठी संपूर्ण कुटुंब पुण्याला गेले होते. प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाली… मुलीला धीर देत आई-वडिलांनी निरोप घेतला… “काळजी घे… मन लावून अभ्यास कर…” असे शेवटचे शब्द कदाचित तिच्या कानात अजूनही घुमत असतील. पण हा निरोप आयुष्यातील शेवटचा निरोप ठरेल, याची कल्पनाही कोणाला नव्हती.समृद्धी महामार्गावर या घटनेपूर्वी इथेनॉलचा एक ट्रक पलटी झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे वाहने टप्प्याटप्प्याने दुसऱ्या लेनवरून सोडली जात होती. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या मिरचीने भरलेल्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कार ट्रकखाली अक्षरशः चिरडली गेली.
धडकेनंतर ट्रकला अचानक आग लागली आणि काही क्षणांत सर्व काही जळून खाक झाले. या भीषण अपघातात कार चालक अंकुश राऊत, राजेश टिपले, जान्हवी टिपले आणि सुषमा टिपले या चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रक चालक संजय कुमार आणि क्लिनर समरजित पाल यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. एका क्षणात दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला.घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस अधिकारी सरिता यादव, पुलगावचे पोलीस निरीक्षक सदाशिव ढाकणे यांच्यासह पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वाहनात अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले. जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सध्या दोन मृतदेह पुलगाव येथे, तर चार मृतदेह वर्धा जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आले आहेत.
मुलीच्या शिक्षणासाठी घरातून निघालेले कुटुंब… हात हलवत मुलीला निरोप दिला… ‘लवकरच पुन्हा भेटू’ अशी आशा मनात ठेवून वर्ध्याकडे परत निघाले… पण तो परतीचा प्रवास त्यांच्या आयुष्याचा अखेरचा प्रवास ठरला. आज त्या मुलीसमोर केवळ आई-वडिलांच्या आठवणी आहेत, अपूर्ण राहिलेले कुटुंब आहे आणि आयुष्यभर न भरून येणारी पोकळी आहे. समृद्धी महामार्गावरील हा अपघात केवळ सहा जणांचा मृत्यू नाही, तर एका कुटुंबाची स्वप्ने, आनंद आणि भविष्य एका क्षणात उद्ध्वस्त झाली




