
तरुणांमध्ये पेटलेल्या या आगीत सरकार भस्मसात झाले पाहिजे – उद्धव ठाकरेंचा घणाघात, शिवसेनेचे आंदोलन
पेपरफुटीविरोधात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही आता क्षुल्लक गोष्ट आहे. हे सरकार पेपरफुटी थांबवू शकत नाही, तरुणांना रोजगार देऊ शकत नाही, जनतेला उत्तर देऊ शकत नाही.त्यामुळे आता प्रधान यांचा राजीनामा नको, तर सरकारच बदलायचे आहे, तरुणांमध्ये पेटलेल्या या आगीत सरकार भस्मसात झाले पाहिजे, असे आवाहन शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
दिल्लीत जंतर-मंतरवर सुरू असलेल्या सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात शिवसेनेकडून (यूबीटी) आंदोलन करण्यात आले. पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पुकारलेल्या या आंदोलनाला तरुणांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. त्याला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी पेपरफुटी, बेरोजगारी, सोनम वांगचुक यांचे आंदोलन दडपण्याचा झालेला प्रयत्न यावरून धर्मेंद्र प्रधान, केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. आपण दिल्लीत पाठिंबा देण्यासाठी जाणारच आहोत, पण राज्यातही गावागावांत हा लढा उभारण्याचे आवाहन केले.मोदी दिल्लीत असूनही वांगचुक यांच्याशी बोलायला तयार नाहीत, याला माणुसकी म्हणायची का, असा सवाल त्यांनी केला. देशासाठी अहोरात्र झटणारा शास्त्रज्ञ उपोषणाला बसल्यानंतर हे सरकार चर्चेला तयार नाही, हे संघाच्या कल्पनेतील हिंदुराष्ट्र आहे का, असा सवालही त्यांनी केला.आदित्य ठाकरे म्हणाले की, जनतेने भाजपला देश बदलण्यासाठी आणि विकास करण्यासाठी बहुमत दिले होते. मात्र, हे लोक आता देशाची राज्यघटना बदलू पाहत आहेत. महाराष्ट्राचा अभिजित दीपके हा तरुण दिल्लीत विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी उपोषणाला बसला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, ही त्याची प्रमुख मागणी आहे. मात्र, आम्ही पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहोत.



