चिपळूणमधील कार्यकर्त्यांच्या बैठकीत ‘चंदा चोर… आरामखोर’ घोषणांनी परिसर दणाणला

राम मंदिर निधीप्रकरणी जनजागृती मोहीम राबवणार; भास्कर जाधवांचा सरकारवर हल्लाबोल

चिपळूण : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूण येथे झालेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत राम मंदिर निधीप्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार टीका करत जनजागृती मोहिमेची घोषणा केली. यावेळी कार्यकर्त्यांनी “चंदा चोर, चंदा चोर… आरामखोर, आरामखोर” अशा घोषणांनी सभास्थळ दणाणून सोडले.

बैठकीत बोलताना जाधव यांनी शाखाप्रमुख आणि विभागप्रमुखांनी गावागावात जाऊन जनजागृती करावी, असे आवाहन केले. सत्ताधाऱ्यांचे कथित पाप जनतेसमोर आणण्याचा निर्धार व्यक्त करत रामाचे बॅनर, भगवा ध्वज, घंटानाद, अभंग आणि आरतीच्या माध्यमातून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यमान सरकार हे हिंदुत्ववादी नसून हिंदुत्वाचे मारक असल्याची टीका करत जाधव यांनी राम मंदिरासाठी जमा झालेल्या निधीच्या कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. तसेच राम मंदिराशी संबंधित चांदी आणि इतर देणग्यांचा संपूर्ण हिशोब जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली.

स्वतःने राम मंदिरासाठी दिलेल्या ताम्रपत्राची पोहोच अद्याप मिळालेली नसल्याचा दावा करत सरकार या विषयावर बोलण्यास तयार नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

राज्यातील प्रत्येक पंचायत समिती गणातील राम मंदिरांमध्ये बैठका घेऊन जनजागृती केली जाईल, असे सांगत सर्व जाती-धर्मातील तसेच सर्व पक्षांतील हिंदू समाजबांधवांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

“रामभक्त कोण आणि रामाच्या नावाचा राजकीय वापर कोण करत आहे, हे जनतेसमोर आणणार आहोत,” असे सांगत या विषयावर इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही आवाज उठविल्याचा उल्लेख त्यांनी केला. जनतेसमोर सत्य मांडून सत्ताधाऱ्यांना राजकीय धडा शिकवू, असा इशाराही भास्कर जाधव यांनी यावेळी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button