चिखलात उतरले ‘खाकी’!; एसपी नितीन बगाटे यांनी शेतकऱ्यांसोबत केली भातलावणी, जिंकली मने

पोलिस म्हणजे केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखणारी यंत्रणा नव्हे, तर समाजाशी जिव्हाळ्याचे नाते जपणारी संवेदनशील व्यवस्था असल्याचे प्रत्यंतर रत्नागिरीचे जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आपल्या अनोख्या कृतीतून दिले. संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड येथे त्यांनी थेट शेतात उतरून शेतकऱ्यांसोबत भातलावणीचा आनंद घेतला.

मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करत असताना बगाटे यांनी मानसकोंड येथील शेतात सुरू असलेली लावणी पाहिली. त्यांनी कोणताही औपचारिकपणा न ठेवता थेट चिखलात उतरून शेतकरी बांधवांशी संवाद साधला. त्यानंतर हातात नांगर घेत नांगरणीचा अनुभव घेतला आणि शेतकऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून भातलावणीतही सहभाग नोंदवला.

या अनपेक्षित भेटीमुळे शेतकरी भारावून गेले. वरिष्ठ पोलिस अधिकारी आपल्या दैनंदिन कामकाजातून वेळ काढून शेतकऱ्यांच्या श्रमात सहभागी झाल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

कोकणातील भातशेती ही येथील संस्कृती आणि जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. या मातीत उतरून शेतकऱ्यांच्या कष्टांचा प्रत्यक्ष अनुभव घेत बगाटे यांनी लोकाभिमुख पोलिसिंगचा वेगळा आदर्श निर्माण केला. त्यांच्या या कृतीचे शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध स्तरांतून कौतुक होत असून, पोलिस आणि जनतेतील विश्वासाचे नाते अधिक दृढ करणारा हा उपक्रम ठरत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button