
’आरजीपीपीएल’वर २८ रोजी जप्तीची कारवाई
आमची सरकारी कंपनी असून आम्ही एमआयडीसीला कर देणे लागतो. तसेच ग्रामपंचायतींनी सुधारीत कर आकारणी केली नाही, अशी कारणे देत कर देण्यास टाळाटाळ करणार्या अंजनवेल येथील आरजीपीपीएल कंपनीवर अखेर अंजनवेल, वेलदूर आणि रानवी या तिन्ही ग्रामपंचायतींनी २८ जुलै रोजी जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने ४ कोटी २८ लाख ५९ हजार ३६० रुपये थकवले असून याबाबतची माहिती शुक्रवारी तीन्ही ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी पत्रकार परिषदेत दिली.
अंजनवेल ग्रामपंचायत सभागृहामध्ये अंजनवेल सरपंच सोनाली मोरे, वेलदूर सरपंच दिव्या वनकर आणि रानवी प्रशासक मनाली कदम तसेच या तिन्ही ग्रामपंचायतीच्या वतीने अंजनवेल ग्रा. प. सदस्य यशवंत बाईत यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये थकित कराबाबतच्या कारवाईची सविस्तर माहिती देताना सांगितले की, कंपनीने २०२०-२१ पर्यंत या तिन्ही ग्रामपंचायतीला कर दिलेला आहे. मात्र २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या कर बजावणीविरोधात कंपनी गटविकास अधिकार्यांकडे अपिलात गेली. कंपनीने २०२१-२२ आणि २०२२-२३ या दोन वर्षाचा इमारत, जमीन कर देण्यास टाळाटाळ केली आहे. आम्ही एमआयडीसीला कर देणे लागतो. त्याचबरोबर या तिन्ही ग्रामपंचायतीनी सलग चार वर्षानंतर फेर आकारणी केलेली नाही, यामुळे आम्ही यांना कर देणे लागत नाही, असे कंपनीने आपल्या अतिलात म्हटले आहे.




