रत्नागिरीत प्रादेशिक चित्रपटांचा मेळा


फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्स इंडिया आणि रत्नागिरी फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जुलै महिन्यात प्रादेशिक चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध भारतीय भाषांतील पुरस्कारप्राप्त तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या चित्रपटांचे प्रदर्शन या महोत्सवात होणार असून चित्रपटप्रेमींसाठी हा अनोखा अनुभव ठरणार आहे.
कार्निव्हल हॉटेलजवळील शर्वाणी हॉल येथे हा महोत्सव होणार असून जुलै महिन्यातील ११, १८ आणि २५ तारखांना प्रत्येकी दोन चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. प्रत्येक चित्रपटानंतर त्यावरील विस्तृत चर्चेचेही आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात प्रदर्शित होणारे चित्रपट इतर कोणत्याही दूरचित्रवाणी वाहिनीवर किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नसून ते केवळ फिल्म सोसायटींसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. काही चित्रपटांच्या प्रदर्शनावेळी संबंधित चित्रपट निर्माते किंवा दिग्दर्शकही उपस्थित राहाण्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली आहे. यंदाच्या महोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मराठी, हिंदी किंवा इतर प्रचलित भाषांबरोबरच मागधी, मिसिंग आणि कारबी यांसारख्या दुर्मिळ भारतीय भाषांतील चित्रपटही रसिकांना पाहाता येणार आहेत.
या महोत्सवाचा लाभ जास्तीत जास्त चित्रपट रसिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आसनव्यवस्था मर्यादित असल्याने इच्छुकांनी आगाऊ आसन आरक्षित करून ठेवावे, असेही सांगण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. नितीन चव्हाण (८९७५७६६६०८) किंवा सुधीर मुळ्ये (९४२१२३४०७५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन रत्नागिरी फिल्म सोसायटीने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button