
आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या ‘कोकण दर्शन’मध्ये पावस आणि गोळपच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक वारशाचा वेध
रत्नागिरी : आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या पर्यटनविषयक ‘कोकण दर्शन’ या कार्यक्रमातून यावेळी रत्नागिरी तालुक्यातील पावस आणि गोळप परिसरातील आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि निसर्ग पर्यटनाचा वेध घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ३ जुलै रोजी सकाळी ८.४० वाजता प्रसारित होणार आहे.
कार्यक्रमात स्वामी स्वरूपानंद यांच्या वास्तव्यामुळे देशभर प्रसिद्ध असलेल्या पावसच्या आध्यात्मिक परंपरेची माहिती देण्यात आली आहे. स्वामी स्वरूपानंद यांचे जीवनकार्य, त्यांचे विपुल लेखन, विचार आणि आजही भाविकांना प्रेरणा देणारा त्यांचा वारसा याविषयी माधुरी देसाई यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
याशिवाय, पावस येथे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या पायी दिंडी परंपरेवरही कार्यक्रमात प्रकाश टाकण्यात आला आहे. एका व्यक्तीच्या संकल्पातून सुरू झालेली ही दिंडी गेल्या २२ वर्षांपासून अखंड सुरू असून, आज त्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत असल्याची माहिती अनंत आगाशे यांनी दिली आहे.
पावसजवळील ऐतिहासिक गोळप गावाचाही या कार्यक्रमात विशेष परिचय करून देण्यात आला आहे. प्राचीन हरिहरेश्वर मंदिर, गावातील पिढ्यानपिढ्या जपल्या गेलेल्या सांस्कृतिक परंपरा, सामाजिक उपक्रम आणि ग्रामजीवनातील वैशिष्ट्ये याविषयी अविनाश काळे यांनी माहिती दिली आहे.
समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य, सह्याद्रीच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य वातावरण, आध्यात्मिक परंपरा आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला लावणारा हा ‘कोकण दर्शन’ कार्यक्रम पर्यटनप्रेमी आणि श्रोत्यांसाठी निश्चितच माहितीपूर्ण ठरणार आहे.
कार्यक्रमाचे लेखन सोनाली सावंत यांचे असून, निवेदन व निर्मिती सहाय्य वंदना मुसळे आणि सोनाली सावंत यांनी केले आहे. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे आहेत.
हा कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरीच्या ११४३ किलोहर्ट्झ मध्यमलहरी, १०१.५ मेगाहर्ट्झ एफ.एम. वाहिनी, तसेच न्यूजऑनएअर मोबाईल ॲप आणि AIR Ratnagiriच्या अधिकृत यूट्यूब वाहिनीवरही ऐकता येणार आहे.




