रत्नागिरी शासकीय रुग्णालयाची मोठी कामगिरी; ८५ वर्षीय महिलेवर एकाचवेळी दोन गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी


रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरीने वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ८५ वर्षीय महिलेवर एकाचवेळी अत्यंत गुंतागुंतीची स्टोमा शस्त्रक्रिया आणि हेमीआर्थ्रोप्लास्टी (खुबा बदलण्याची शस्त्रक्रिया) यशस्वीरीत्या करून रुग्णालयाने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

परटवणे (ता. रत्नागिरी) येथील श्रीमती आनंदी गंगाराम चव्हाण (वय ८५) या १२ मे २०२६ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांना रेक्टल प्रोलॅप्स (संडासची जागा वारंवार बाहेर येणे) हा त्रास होता. यापूर्वी त्यांच्यावर या आजाराची शस्त्रक्रिया झाली होती. याशिवाय त्यांचा डावा खुबा फ्रॅक्चर झाला होता आणि उच्च रक्तदाबाचाही त्रास होता.

रुग्णाचे वाढते वय, हृदयाची कमकुवत स्थिती आणि इतर व्याधी लक्षात घेता दोन्ही शस्त्रक्रिया एकाचवेळी करणे हे मोठे आव्हान होते. साधारणपणे अशा शस्त्रक्रियांसाठी पूर्ण भूल देणे आवश्यक असते; मात्र रुग्णाची हृदयविषयक स्थिती लक्षात घेऊन कमरेखालच्या भागापुरतीच भूल देण्यात आली.

विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेतील जोखीम लक्षात घेऊन काही खासगी रुग्णालयांनी उपचार करण्यास नकार दिला होता. त्यानंतर रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल झाल्या. काही आठवड्यांच्या उपचारानंतर १९ मे २०२६ रोजी त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर, शल्यचिकित्सा विभागप्रमुख डॉ. जिज्ञासा भाटे, अस्थिव्यंगोपचार विभागप्रमुख डॉ. निखिल देवकर, भुलतज्ज्ञ डॉ. जामशेर, डॉ. प्रियांका तसेच ऑपरेशन थिएटरमधील कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.

शस्त्रक्रियेनंतर श्रीमती आनंदी चव्हाण यांची प्रकृती समाधानकारक राहिली असून त्यांना १० जून २०२६ रोजी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरीच्या वैद्यकीय सेवांबाबतचा विश्वास अधिक दृढ झाला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button