
शाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक, नव्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तकेच तयार नसल्याचे धक्कादायक वास्तव
शाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना नव्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तकेच तयार नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. प्रशासनाच्या कामकाजातील दिरंगाईमुळे इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकांच्या छपाईला विलंब झाला आहेदिरंगाईमुळे नव्या अभ्यासक्रमावर आधारित नव्या पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीची प्रक्रिया लांबली. परिणामी आता राज्यातील शाळा १५ जूनपासून सुरू होत असल्या तरी इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. नव्या अभ्यासक्रमांची सर्व माध्यमांची सर्व पाठ्यपुस्तके मिळण्यासाठी जूनअखेर उजाडणार आहे.
राज्यात शालेय अभ्यासक्रमात नव्याने बदल झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने बालभारतीमार्फत पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली जाते. परंतु यंदा बालभारतीच्या कारकिर्दीत प्रथमच एका वर्षी चार इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने येत आहेत.
त्याचबरोबर, पाठ्यपुस्तकांच्या निर्मिती प्रक्रियेत अभ्यासक्रमाला मान्यता मिळणे, विविध पातळ्यांवर होणारे गुणवत्ता परीक्षण, अंतिम मान्यता याला विलंब झाल्याने प्रत्यक्ष छपाईचे काम उशिराने सुरू झाले. त्यामुळे यंदा नियमितपणे शाळा सुरू झाल्या तरी संबंधित इयत्तांचे वर्ग पाठ्यपुस्तकांविनाच भरणार असल्याचे वास्तव आहे.




