
विद्यार्थ्यांना बालपणापासून वाहतुकीचे धडे, राज्यभरात सुमारे ६० ठिकाणी ट्रॅफिक गार्डन्स
राज्यातील वाढत्या रस्ते अपघातांवर आळा घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी लहान वयापासून जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. परिवहन विभागाने राज्यभरात सुमारे ६० ठिकाणी ट्रॅफिक गार्डन्स (वाहतूक उद्यान) उभारण्याचा प्रस्ताव तयार केला असून, प्रत्येक जिल्ह्यात किमान एक ट्रॅफिक गार्डन उभारले जाणार आहे.
या उपक्रमासाठी सुमारे ६० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रत्येक वाहतूक उद्यान सुमारे एक एकर जागेत विकसित करण्यात येणार असून, एका उद्यानासाठी अंदाजे एक कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. या ट्रॅफिक गार्डन्समध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून वाहतूक नियम शिकविण्यात येणार आहेत.
उद्यानामध्ये लहान आकाराचे रस्ते, झेब्रा क्रॉसिंग, वाहतूक सिग्नल, दिशादर्शक फलक तसेच छोट्या वाहनांच्या प्रतिकृती उभारल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना खेळता-खेळता वाहतुकीचे नियम समजून घेण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे ही सुविधा केवळ शालेय विद्यार्थ्यांसाठीच मर्यादित राहणार नसून सर्वसामान्य नागरिकांनाही खुली असणार आहे. वाहन परवाना मिळविण्यासाठी आवश्यक असलेला ट्रायल ट्रॅकही या उद्यानांमध्ये उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्यामुळे नवीन वाहनचालकांना सुरक्षित वाहनचालकाचे प्रशिक्षण घेणे अधिक सोपे होणार आहे. वाहतूक शिक्षणाबरोबरच पर्यावरण संवर्धनालाही या उपक्रमात प्राधान्य देण्यात आले आहे. उद्यान परिसरात देशातील दुर्मिळ वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, त्यांच्या पर्यावरणीय महत्त्वाची माहितीही नागरिकांना दिली जाणार आहे.
तसेच भविष्यातील ई-वाहने (इलेक्ट्रिक व्हेईकल्स) आणि त्यासंबंधीची माहितीही येथे उपलब्ध करून दिली जाईल. शाळांच्या वेळेनुसार विद्यार्थ्यांना नियोजनबद्ध प्रवेश दिला जाणार असून, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडून या उद्यानांच्या व्यवस्थापनासाठी नाममात्र प्रवेश शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे. वाहतूक शिस्त, सुरक्षित वाहनचालक घडविणे आणि पर्यावरण जनजागृती या तिन्ही उद्दिष्टांची सांगड घालणारा हा उपक्रम राज्यासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे मानले जात आहे.www.konkantoday.com




