
लोटे एमआयडीसीतील नंदादीप केमिकल कंपनीत वायू गळती, परिस्थिती नियंत्रणात
लोटे एमआयडीसीतील नंदादीप केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये शुक्रवारी सकाळी वायू गळती झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील कामगार व नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा कामगार जखमी झाल्याची नोंद नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी परिसरात अचानक वायूचा उग्र वास पसरल्याने तेथे काम करणारे कामगार आणि आसपासचे नागरिक अस्वस्थ झाले. काहींना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच कारखाना व्यवस्थापनाने तातडीने उपाययोजना करत परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे सांगितले. दरम्यान, लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये रसायनांची साठवणूक व हाताळणी करताना काही कारखानदारांकडून आवश्यक सुरक्षितता नियमांचे पालन होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. यापूर्वीही अशाप्रकारच्या घटनांमुळे कामगार व नागरिकांना श्वसनासंबंधी त्रास सहन करावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.




