रत्नागिरीत जागतिक सागरी कासव दिनाचे आयोजन; सागरी कासव व वन्यजीव उपचार केंद्रा’चा शुभारंभ

रत्नागिरी
डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी’ आणि महाराष्ट्र शासनाचे कांदळवन विभाग, दक्षिण कोकण (वन परिक्षेत्र, कांदळवन) यांच्या संयुक्त विद्यमाने आज १६ जून २०२६ रोजी ‘जागतिक सागरी कासव दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्यगीत आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या गीताने करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. आसिफ पागरकर, प्राध्यापक, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी यांनी केली.


या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे ‘सागरी कासव व सागरी वन्यजीव उपचार केंद्रा’चा झालेला शुभारंभ. या केंद्राबद्दल माहिती देताना कांदळवन विभागाचे वनरक्षक श्री. किरण ठाकूर म्हणाले की, “गत अनेक वर्षांपासून आपण सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात जखमी कासवांवर उपचार करून त्यांना पुन्हा समुद्रात सोडत आहोत. याच कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी आज आपण हे समर्पित उपचार केंद्र सुरू करत आहोत.” यावेळी त्यांनी प्लास्टिक कचरा आणि जहाजांमुळे होणाऱ्या प्रदूषणातून सागरी प्राण्यांना होणाऱ्या इजांबाबत चिंता व्यक्त केली. अशा उपक्रमांमधून जनजागृती करणे ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
मानद वन्यजीव रक्षक श्रीमती सोनाली मेस्त्री यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की, “हे नवीन उपचार केंद्र मच्छिमार बांधव आणि जलचर प्राणीप्रेमींसाठी एक मोठी भेट आहे. या सुविधेचा लाभ सर्वांनी घ्यावा.”


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांनी कासवांचे धार्मिक आणि पर्यावरणीय महत्त्व विशद केले. ते म्हणाले, “आपल्या संस्कृतीत कासवाला महत्त्वाचे स्थान आहे, जे कासवांच्या संरक्षणाची गरज आपल्या पूर्वजांनाही होती हे दर्शवते. आज प्लास्टिक प्रदूषण ही मोठी समस्या बनली आहे. एकदा वापरले जाणारे प्लास्टिक २०० वर्षे नष्ट होत नाही, त्याचे रूपांतर ‘प्लास्टिक्युल्स’ मध्ये होऊन ते मासे आणि पर्यायाने मानवी आरोग्यासाठी घातक ठरते. त्यामुळे प्लास्टिकचा वापर टाळणे काळाची गरज आहे.” तसेच, हे केंद्र सुरू केल्याबद्दल त्यांनी कांदळवन विभागाचे विशेष आभार मानले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात, कासवांचे संरक्षण आणि प्लास्टिक प्रदूषणाविरुद्ध लढा देण्याचा संकल्प करत उपस्थित सर्वांनी सामूहिक प्रतिज्ञा घेतली. ‘सागरी कासव व वन्यजीव उपचार केंद्रा’ करिता कांदळवन कक्षामार्फत विविध प्रथमोपचार, तसेच आवश्यक साहित्य सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रास हस्तांतरित करण्यात आले. या उपचार केंद्राचे उद्धाटन डॉ. केतन चौधरी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. शेवटी उपस्थित अधिकारी व कर्मचारी वर्गामध्ये चर्चासत्र पार पडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. अपूर्वा सावंत यांनी केले, तर समन्वयाचे काम प्रा. सचिन साटम यांनी केले. या उद्घाटन सोहळ्याला कांदळवण कक्षाचे श्री. डाफळे, श्री. ऋषिकेश भाटकर आणि वनरक्षक अधिकारी व कर्मचारी हजार होते. यावेळी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे डॉ. मनोज घुघुसकर, प्रा. नरेंद्र चोगले, सहाय्यक संशोधन अधिकारी, डॉ. हरिष धमगाये, अभिरक्षक, श्रीम. वर्षा सदावर्ते हे उपस्थित होते. मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन चे विद्यार्थीचे यावेळी उपस्थित होते तर, श्री. महेश किल्लेकर, श्री दिनेश कुबल, श्रीम. जाई साळवी, श्री. सचिन पावसकर, श्री. प्रविण गायकवाड, श्री. सुहास कांबळे, श्री. सचिन चव्हाण, श्रे. तेजस जोशी, श्री. उल्हास पेडणेकर, श्री प्रशांत पिलणकर, श्री. स्वप्नील आलीम यांनी कार्यक्रम आयोजनाकरिता विशेष परिश्रम घेतलेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button