
मोसमी पावसाची वाट खडतरच! राज्यात काही भागात उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती!!____
मुंबई : राज्यातील हवामानात सध्या झपाट्याने बदल होत असून बहुतांश भागात उष्ण आणि दमट वातावरण, काही भागात उष्णेतच्या लाटेसदृश्य स्थितीचा प्रभाव तर काही भागात वादळी पावसाची स्थिती आहे.
मोसमी पाऊस लांबल्याने राज्यात सध्या वाढत्या तापमानामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थितीची नोंद होत आहे. तसेच मोसमी पावसाची राज्यातील उत्तर सीमा चार दिवसांपासून एकाच जागी स्थिर असून पुढील काही दिवस त्यात फारसे बदल होणार नाहीत, असा हवामान अभ्यासकांचा अंदाज आहे.
तळकोकणात ६ जून रोजी मोसमी पावसाचे आगमन झाल्यानंतर राज्यातील इतर भागातही त्याची वाटचाल वेगाने होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, मोसमी वारे काहीसे कमकुवत झाले असून मागील चार दिवसांपासून ते एकाच जागी स्थिर आहेत. वायव्य दिशेकडून येणारे उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव, मोसमी वारे सक्रिय होण्यासासाठी आवश्यक असणाऱ्या प्रणालीचा अभाव, तसेच मोसमी पावसासाठी मोठ्या प्रमाणावर ढगांची घनता अपेक्षित असते त्याचा अभाव आहे.
अशा काही कारणांमुळे मोसमी वाऱ्यांची उत्तरेकडील वाटचाल संथ गतीने सुरु आहे, असे हवामान अभ्यासकांचे मत आहे. दरम्यान, रविवारी मोसमी पावसाने देशात विशेष वाटचाल केली नसून त्याची सीमा स्थिर आहे. पुढील ४ ते ५ दिवसात राज्यातील आणखीन काही भागांसह कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि पश्चिम बंगालच्या उर्वरित भागात मोसमी पाऊस दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने रविवारी वर्तवला आहे. मात्र, या दरम्यान महाराष्ट्रात मोसमी वाऱ्यांची वाटचाल दिलासादायक असणार नाही, असे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.
दरम्यान, राज्यातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथेही पाऊस कमी झाल्याचे चित्र आहे तर कोकण प्रदेशातील बहुतांश भाग, मध्य महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील काही भागात उष्ण दमट वातावरणाची नोंद रविवारी झाली. त्यामुळे या प्रदेशातील नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णेतची लाटेसदृश्य स्थितीची नोंद झाली तर काही भागात वादळी पावसाची स्थिती आहे. पुढील ३ ते ४ दिवस ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, सोमवारी राज्यातील बहुतांश भागात हवामान कोरडे राहणार असून काही भागात वादळी पाऊस तर काही भागात हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
‘एल-निनो’मुळे पाणीकपातीचे सक्त निर्देश, सिंचनासाठी प्रस्तावित व सुरु असलेली आवर्तने तात्काळ थांबविण्याचे आदेश
उत्तर कोकणात उकाडा असह्य
उत्तर कोकणात अजूनही पूर्व मोसमी पाऊस सक्रिय झाला नसून मागील काही काळापासून या प्रदेशातील नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे. त्यातच उष्ण आणि दमट वातावरणामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत. मुंबईतही सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी ढंगाची दाटी दिसून येत आहे. मात्र, पाऊस पडत नसल्याने मुंबईकरांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, रविवारी हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ३५.६ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात ३५.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. शहरात सोमवारी कमाल तापमान ३५ अंश तर किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तसेच सोमवारी आणि मंगळवारी मुंबईसह, ठाणे, पालघर आणि रायगड येथे उष्ण आणि दमट वातावरण राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्वतली आहे. त्यामुळे उत्तर कोकणवासीयांना पुढील काही दिवस मोसमी पावसाची वाट पाहावी लागणार आहे.




