प्रसिद्ध जलतरण प्रशिक्षक व माजीसैनिक शंकरराव मिलके यांचे निधन; रत्नागिरीत हळहळ


रत्नागिरी शहरातील ज्येष्ठ जलतरण प्रशिक्षक, माजीसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते शंकरराव मिलके यांचे सोमवारी दुपारी पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. ते ७० वर्षांच्या आसपासचे होते. त्यांच्या निधनाने रत्नागिरीतील क्रीडा, सामाजिक आणि माजीसैनिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्याने पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान सोमवारी दुपारी सुमारे २.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

शंकरराव मिलके हे माजीसैनिक म्हणून देशसेवा बजावल्यानंतर रत्नागिरीत जलतरण प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत होते. समुद्रात प्रत्यक्ष प्रशिक्षण देत त्यांनी अनेकांना पोहण्याचे धडे दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवा जलतरणपटू घडले असून त्यांनी जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे.

वयोमानानुसारही त्यांनी जलतरणाची आवड कायम जपली होती. विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत त्यांनी अनेक पारितोषिकेही मिळवली होती. सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या कार्याचा वारसा त्यांच्या कुटुंबीयांकडून पुढे चालवला जात आहे.

त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

शंकरराव मिलके यांच्या निधनामुळे रत्नागिरीने एक कुशल प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button