जिल्हा अन्न व औषध प्रशासनाने जिल्हाभरात धडक छापेमारीत मोठ्या प्रमाणावर गुटखा व पानमसाला केला जप्त


राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक आदेशानंतर रत्नागिरी एफडीए प्रशासन अक्षरशः ऍक्शन मोड मध्ये आले आहे. जिल्हाभरात केलेल्या घडक छापेमारीत तब्बल ६ लाख १४ हजार ५५७ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सहा गुन्हे दाखल करून आठ संशयितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. अवैध व्यवसायाला मुळापासून उखडून काढण्यासाठी ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच, संपूर्ण महाराष्ट्रात शिस्तीचा नवा पायंडा पडला आहे. ’मुंढे पॅटर्न’चा दणका आता रत्नागिरीतही दिसून येत आहे. प्रशासनाने अवैध गुटखा विक्रेत्यांसह नियम मोडणार्‍या हॉटेल चालकांवर जोरदार कारवाईचा बडगा उगारला आहे. या धडक मोहिमेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
केवळ गुटखा माफियाच नव्हे, तर हॉटेल व्यावसायिकांचेही धाबे आता दणाणले आहेत. पथकाने जिल्ह्यातील ६० हॉटेल्सवर अचानक धाडी टाकून तपासणी केली. यामध्ये स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या चार हॉटेल मालकांना ’सुधारणा नोटीस’ बजावण्यात आली आहे, तर नियमांची पायमल्ली करणार्‍यांकडून २४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रत्नागिरीतील २ हजार ७५६ परवानाधारक आणि १६ हजार ६१० नोंदणीकृत व्यावसायिकांवर आता प्रशासनाची करडी नजर असणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button