
जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये कुजलेली फळे विकणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यावर कारवाई; आरपीएफच्या ताब्यात
प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या एका अनधिकृत विक्रेत्यावर कोकण रेल्वेने कठोर कारवाई केली आहे. मडगाव-मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये कुजलेली फळे विक्रीसाठी ठेवून प्रवाशांची दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीला दंड ठोठावण्यात आला असून पुढील कारवाईसाठी त्याला रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई ३१ मे रोजी गाडी क्रमांक १२०५२ मडगाव-मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये करण्यात आली. नियमित तपासणीदरम्यान संबंधित व्यक्ती कोणत्याही अधिकृत परवान्याशिवाय डब्यांमध्ये फळांची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. तपासणीदरम्यान विक्रीसाठी ठेवलेल्या काही फळांचा दर्जा अत्यंत खराब असून ती कुजलेली असल्याचे आढळले.
कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता संबंधित व्यक्तीकडे वैध परवाना किंवा ओळखपत्र नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर रेल्वे नियमांनुसार त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आणि पुढील तपासासाठी त्याला रत्नागिरी येथील आरपीएफच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सेवा मिळाव्यात यासाठी कोकण रेल्वेने ३१ मेपासून १५ दिवसांची विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. वाणिज्य विभाग आणि आरपीएफच्या संयुक्त पथकांकडून रेल्वे स्थानके तसेच धावत्या गाड्यांमध्ये तपासणी केली जात आहे.
अनधिकृत विक्री, अवाजवी दर आकारणी, निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आणि इतर गैरप्रकारांना आळा घालणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असून स्वच्छता व प्रवासी सेवांचा दर्जा कायम राखण्यावरही विशेष भर दिला जात आहे.
कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, अनधिकृत विक्रेते अथवा कोणताही गैरप्रकार आढळल्यास तातडीने रेल्वे प्रशासन किंवा आरपीएफकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.




