कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध; उर्वरित प्रश्न सोडविण्यावर भर देणार : अनिकेत तटकरे

चिपळूण : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर आमदार अनिकेत तटकरे यांनी चिपळूण येथे पत्रकारांशी संवाद साधताना महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांच्या भूमिकेचे स्वागत करत त्यांचे मनापासून आभार मानले. कोकणच्या विकासाशी संबंधित उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्राधान्याने काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

अनिकेत तटकरे म्हणाले की, या निवडणुकीत महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच ही बिनविरोध निवड शक्य झाली. यासाठी त्यांनी महायुतीच्या सर्व नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे तसेच मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींचे आभार व्यक्त केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा घेतलेला निर्णय हा लोकशाही प्रक्रियेत महत्त्वाचा असल्याचे सांगत तटकरे यांनी त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले. “बाळ माने यांनी घेतलेल्या निर्णयामुळे निवडणूक बिनविरोध झाली. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो,” असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी “सुनील तटकरेंकडे भानामती आहे” असे वक्तव्य करून त्यांच्या राजकीय करिष्म्याला अप्रत्यक्षपणे मान्यता दिल्याची टिप्पणी केली. सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली कोकणात विकासाची अनेक कामे झाली असून त्याच विकासाच्या धाग्याला पुढे नेण्याचे काम आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोकणातील पायाभूत सुविधा, मत्स्यव्यवसाय, पर्यटन, उद्योग, शिक्षण तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडित विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी विधान परिषद सदस्य म्हणून सक्रियपणे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या विजयाबद्दल बोलताना अनिकेत तटकरे यांनी हा विजय राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्पित करत असल्याचे सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि महायुतीच्या एकजुटीमुळेच हा विजय शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.

कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण पूर्ण क्षमतेने काम करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button