
कीर्तनकार हभप रोहिणी माने-परांजपे यांची रत्नागिरीत आजपासून तीन दिवस कीर्तने
रत्नागिरी : अधिक मास (पुरुषोत्तम मास) निमित्त रत्नागिरीमध्ये सुप्रसिद्ध व लोकप्रिय कीर्तनकार हभप रोहिणी माने-परांजपे यांची तीन दिवस कीर्तने आयोजित करण्यात आली आहेत. अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, रत्नागिरी व वात्सल्य- स्नेह, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि जयेश मंगल पार्क आणि खल्वायन रत्नागिरी यांच्या सौजन्याने कीर्तन रंग महोत्सवाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. जयेश मंगल पार्कमध्ये दि. ३, ४ व ५ जून रोजी सलग तीन दिवस सायंकाळी ६ ते ९ या वेळात नारदीय कीर्तने रंगणार आहेत.
हभप रोहिणी माने-परांजपे या नारदीय व वारकरी कीर्तनातील आघाडीच्या कीर्तनकार आहेत. कीर्तन विश्व, यू ट्यूब चॅनल, झीटीव्ही, एबीपी माझा चॅनेल्स वर त्यांची अनेक रसाळ व भक्तीरसपूर्ण कीर्तने सातत्याने ऐकणारे आज लाखो श्रोते आहेत. कीर्तनाची पक्की तालीम त्यांनी हभप कीर्तन कलाशेखर नारायणबुवा काणे (कोल्हापूर) व राष्ट्रीय कीर्तनकार हभप न. चि. अपामार्जने यांच्याकडून घेतली आहे. वयाच्या ११ व्या वर्षापासून त्यांनी कीर्तने सादर करण्यास सुरवात केली. संगीत विशारद व एमए (शास्त्रीय संगीत) दोन पदव्या तसेच पुणे विद्यापीठाची एमए ( मराठी साहित्य) व कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्व विद्यापीठाची बीए (कीर्तन शास्त्र) या पदव्यासुद्धा त्यांना प्राप्त आहेत. पुण्याचे प्रसिद्ध गायक व गुरू पंडित हेमंत पेंडसे यांच्याकडून त्यांनी गायनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले आहे. कीर्तन रत्न, कीर्तन चंद्रिका, समाज प्रबोधन क्षेत्रातील अहिंसा व नुकताच त्यांना कीर्तन शिरोमणी हा पुरस्कार मिळालेला आहे.
ऑर्गनची साथ त्यांचे यजमान कौस्तुभ परांजपे करणार आहेत. मूळचे उंबरवाडी – कोतवडे येथील असून सध्या ते पुणे येथे वास्तव्यास आहेत. गेल्या २५ वर्षांपासून अनेक कीर्तने आणि गायन कार्यक्रमांना त्यांनी साथसंगत केली आहे. नारदीय व वारकरी कीर्तने सुद्धा त्यांनी अनेक ठिकाणी सादर केली आहेत. युवा कीर्तनकार, कीर्तन भूषण आणि स्वर कौस्तुभ या पदव्या त्यांना प्राप्त आहेत.
तबला साथ संगत मूळचे सोलगाव राजापूर येथील आणि सुरेश आंबेकर व तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांचे शिष्य अमेय हर्डीकर करणार आहेत. तबला शिक्षणातील बीएव एमए या परीक्षा ते उत्तीर्ण आहेत. आजवर अनेक नामवंत कीर्तनकार व भागवतकारांना त्यांनी एक हजारांहून अधिक कार्यक्रमातून तबल्याची साथ संगत केली आहे.
कीर्तनरंग महोत्सवाला सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून रोहिणीताईंच्या भक्तीरसपूर्ण रसाळ वाणीतील कीर्तनांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




