कामथे ग्रामीण रुग्णालयातील महिला डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात; ४,५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात कारवाई


चिपळूण तालुक्यातील कामथे येथील शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरला ४,५०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर कांचन मदार यांच्याविरोधात एका नागरिकाने तक्रार दाखल केली होती. विशिष्ट प्रकारच्या औषधांच्या गोळ्या उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी ४,५०० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला.

पूर्वनियोजित कारवाईनुसार बुधवारी सायंकाळी सुमारे ७ ते ७.३० वाजण्याच्या दरम्यान डॉक्टर मदार या लाचेची रक्कम स्वीकारत असताना एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईमुळे शासकीय आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.

घटनेनंतर संबंधित डॉक्टरांविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, लाच मागण्यामागील कारणे तसेच प्रकरणातील इतर बाबींचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

सरकारी रुग्णालयातील डॉक्टरच लाच स्वीकारताना पकडल्या गेल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात असून, या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button