
आ. किरण सामंत यांच्या सूचना आणि २४ तासात कोंढेतड शाळेवरील ११ केव्ही वीजवाहिनी हलविली.
राजापूर शहरानजीकच्या कोंढेतर्फ राजापूर तथा कोंढेतड जिल्हा परिषद शाळा क्र. दोनच्या इमारतीवरून जाणारी धोकादायक ११ केव्ही वीजवाहिनी अखेर हटविण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रदिर्घकाळ ही मागणी स्थानिकांकडून करण्यात येत होती. मात्र आमदार किरण सामंत यांच्या तत्काळ हस्तक्षेपामुळे अवघ्या २४ तासांत हे काम पूर्ण झाले आणि ग्रामस्थांनी त्यांना धन्यवाद दिले.
शाळेच्या इमारतीवरून गेलेली ही वीजवाहिनी पावसाळ्यात वादळी वार्यामुळे शाळेच्या छताला स्पर्श करीत होती. तसेच जीर्ण झालेली वीजवाहिनी आणि वीजखांब केव्हाही कोसळून विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. ही समस्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. या गंभीर समस्येबाबत माजी उपसरपंच अरविंद लांजेकर यांनी ग्रामस्थांच्यावतीने आमदार सामंत यांच्याकडे कैफियत मांडली होती.
दरम्यान काही दिवासांपूर्वी डोंगर येथील पक्षीय कार्यक्रम आटोपून रात्री सुमारे नऊ वाजता मुंबईकडे जात असताना आमदार सामंत यांनी कोंढेतड येथे वाहन थांबून ग्रामस्थांची भेट घेतली. त्यांनी घटनास्थळी जाऊन समस्येची पाहाणी केली आणि संबंधित अधिकार्यांशी तत्काळ संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या. त्यांच्या निर्देशानंतर संबंधित यंत्रणेने तातडीने काम हाती घेत अवघ्या २४ तासांत धोकादायक वीजवाहिनी हलवण्याचे काम पूर्ण केले.
www.konkantoday.com




