
अप्पर तहसीलदार कार्यालय रायपाटणला मंजुर
राजापूर :- राजापूर तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा रायपाटण अप्पर तहसीलदार कार्यालयाचा प्रस्ताव अखेर मंजूर झाल्याने परिसरातील जनतेत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निर्णयामुळे राजापूरच्या पूर्व विभागातील नागरिकांना महसूल विषयक कामांसाठी होणारी गैरसोय मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे.
राजापूर तालुका भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असून त्याचा पूर्व भाग सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंत विस्तारलेला आहे त्यामुळे या भागातील नागरिकांना महसूल कार्यालयीन कामांसाठी सध्या २५ ते ६० किलोमीटरपर्यंतचा प्रवास करावा लागत होता. यामुळे वेळेचा अपव्यय तसेच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याची भावना नागरिकांमधून वारंवार व्यक्त केली जात होती.
रायपाटण तालुका निर्मितीची मागणी सुमारे ३५ वर्षांपूर्वी शासनाकडे करण्यात आली होती. त्यानंतर विविध कालखंडात तत्कालीन महसूलमंत्री, विरोधी पक्षनेते, आमदार तसेच विधानपरिषद सदस्यांनी या मागणीसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. गेल्या अनेक वर्षांत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतही विविध संसदीय माध्यमांतून या विषयावर चर्चा झाली होती. त्यामुळे शासनाच्या प्रस्तावित तालुक्यांच्या यादीत रायपाटणचा समावेश करण्यात आला होता.
शासनाच्या नव्या धोरणानुसार रायपाटण ग्रामपंचायतीने सन २०२० मध्ये अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे सादर केला होता.राजापूर पूर्व विभागातील ३२ गावांच्या दृष्टीने हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असल्याने सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक प्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर राज्य शासनाच्या महसूल विभागाने शासन निर्णय जारी करून रायपाटण येथे अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे.




