शासन व प्रदूषण नियंत्रण यंत्रणांचे लक्ष वेधण्यासाठी लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात चिपळुणात स्वाक्षरी आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद


खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील वाढत्या प्रदूषणाच्या प्रश्नावर नागरिकांचा संताप तीव्र होत असून, लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीच्या महिला आघाडीतर्फे रविवारी स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली. शहरातील अण्णासाहेब खेडेकर संकुल येथे झालेल्या या मोहिमेला पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हजारो नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीने लोटे औद्योगिक वसाहतीमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाविरोधात गेल्या काही महिन्यांपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. विशेषतः पीएफएएस उत्पादन करणाऱ्या लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीवर कारवाई करून कंपनी बंद करण्याची मागणी समितीकडून सातत्याने केली जात आहे.

शासन व प्रदूषण नियंत्रण यंत्रणांचे लक्ष वेधण्यासाठी समितीने १२ मेपर्यंत स्वाक्षरी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला असून, चिपळूणनंतर ही मोहीम इतर तालुक्यांमध्येही नेण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

महिला आघाडीतर्फे आयोजित या मोहिमेचे उद्घाटन हुसेन दलवाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भरत लब्धे, पंकज दळवी, तुळशीराम पवार, शहानवाज शहा, अझिम सुर्वे, फैसल देसाई, इब्राहिम दलवाई, सुमती जांभेकर, रविना गुजर, डॉ. रेहमत जबले, स्वाती भोजने, नगरसेविका सफा गोठे, तृप्ती कदम, शामिना परकार, रेहाना बिजले, वीणा जावकर, स्नेहल चव्हाण, शमा जाधव, सईदा शेखदारे आणि नसरिन खडस आदी उपस्थित होते.
.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button