वादळामुळे संगमेश्वर तालुक्यातील वीजपुरवठा विस्कळीत; महावितरणकडून युद्धपातळीवर दुरुस्ती

संगमेश्वर: शनिवारी (दि. ९ मे) झालेल्या जोरदार वादळामुळे संगमेश्वर तालुक्यातील अनेक भागांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. आसुर्डे, सोनवडे, देवळे, फणसावळे, शिवणे, कसबा, धामणी, गोळवली, परचुरी, वांद्री, कोळंबे, महाबळे, लोवले आदी ठिकाणी सुमारे शंभर उच्च व लघुदाब वीज खांब कोसळल्याने वीसहून अधिक वीजवाहिन्यांचा पुरवठा खंडित झाला.

अपघात टाळण्यासाठी पडलेल्या ठिकाणचा वीजपुरवठा तातडीने बंद करण्यात आला. याशिवाय संगमेश्वर, देवरुख आणि साडवली उपकेंद्रांना वीजपुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही आरवली आणि निवळी या दोन्ही वाहिन्यांमध्ये बिघाड निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झाल्या होत्या.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले. अथक प्रयत्नांनंतर आरवली वाहिनी शनिवारी मध्यरात्री सुरू करण्यात आली. त्यामुळे पडलेल्या खांबांच्या परिसराव्यतिरिक्त संगमेश्वर व देवरुखमधील सुमारे ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले.

त्यानंतर रविवारी निवळी वाहिनीवरील विविध ठिकाणचे बिघाड शोधून दुरुस्ती करण्यात आली आणि सायंकाळी चार वाजता ही वाहिनीही पूर्णपणे सुरू करण्यात आली. त्यामुळे भविष्यात एक वाहिनी बंद पडल्यास दुसऱ्या वाहिनीमार्फत तातडीने वीजपुरवठा सुरू ठेवणे शक्य होणार आहे.

दरम्यान, ज्या ठिकाणी वीज खांब कोसळल्यामुळे अजूनही वीजपुरवठा खंडित आहे, त्या भागांमध्ये दुरुस्तीचे काम सुरू असून लवकरच वीजपुरवठा पूर्ववत केला जाईल, असे महावितरण संगमेश्वर विभागाकडून सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button