
राजापूर बस डेपो व बाजारपेठेत संशयित महिलांची वर्दळ; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
राजापूर शहरातील बस डेपो तसेच मुख्य बाजारपेठ परिसरात साडी परिधान केलेल्या ३ ते ४ संशयित महिलांची वर्दळ वाढल्याची माहिती समोर आली आहे. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या पर्स, मोबाईल तसेच पुरुषांच्या खिशातील पाकीट चोरी करण्याच्या घटना घडत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
विशेषतः बसस्थानक, बाजारपेठ, दुकाने आणि अन्य गर्दीच्या भागांमध्ये या महिलांचा वावर आढळून येत असून, त्या अत्यंत सफाईदार पद्धतीने चोरी करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यांचा पेहराव आणि वागणूक सामान्य व ‘स्टॅन्डर्ड’ असल्यामुळे सहजपणे संशय येत नसल्याचे सांगितले जात आहे.
या पार्श्वभूमीवर राजापूर पोलिसांनी नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गर्दीच्या ठिकाणी मोबाईल, पर्स, पाकीट आणि इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात. तसेच कोणतीही अनोळखी किंवा संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
राजापूर परिसरातील व्यापारी, प्रवासी आणि नागरिकांनी विशेष काळजी घेऊन सतर्कता बाळगावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.




