रत्नागिरी शहर प्रमुख प्रशांत साळुंखे यांच्या तत्परतेमुळे विहिरीत पडलेल्या वासराला जीवदान!

•धाडसी मोहिमेनंतर खोत आजींसह नवलाईनगरच्या नागरिकांनी मानले आभार

नवलाईनगर येथील एका ४० फूट खोल विहिरीत पडलेल्या निरागस वासराला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रत्नागिरी शहर प्रमुख श्री. प्रशांत साळुंखे यांच्या गतिमान हालचाली आणि नगरपालिकेच्या रेस्क्यू टीमच्या अजोड धाडसामुळे जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे. या थरारक मोहिमेनंतर संपूर्ण परिसरातून या बचावकार्याचे कौतुक होत आहे.
काल संध्याकाळी ६:४० वाजण्याच्या सुमारास नवलाईनगर येथील खोतांच्या विहिरीत एक वासरू पडल्याची माहिती रत्नागिरी शहर प्रमुख श्री. प्रशांत साळुंखे यांना फोनद्वारे मिळाली. वासरू गेल्या अर्ध्या तासापासून विहिरीत अडकले होते. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून श्री.प्रशांत साळुंखे यांनी एका कार्यक्रमात व्यस्त असतानाही क्षणाचाही विलंब न लावता तातडीने नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना फोन करून घटनेची कल्पना दिली. मुख्याधिकाऱ्यांनी तात्काळ अग्निशामक दलाच्या यंत्रणेला पाचारण केले आणि रेस्क्यू टीम अवघ्या १० मिनिटांत घटनास्थळी हजर झाली.

अंधाऱ्या विहिरीतील थरारक रेस्क्यू ऑपरेशन:

विहीर १० बाय १० आकाराची आणि सुमारे ४० फूट खोल होती. विहिरीत प्रचंड अंधार, आजूबाजूला वाढलेले गवत आणि खाली जाणवणारी ऑक्सिजनची कमतरता, अशा अत्यंत कठीण परिस्थितीत रेस्क्यू टीमचा एक धाडसी कर्मचारी कमरेला दोर बांधून विहिरीत उतरला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख श्री. प्रशांत साळुंखे हे स्वतः शाखाप्रमुख सिद्धेश्वर कोळी, सर्फराज शेख आणि राजू सुर्वे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण मोहिमेवर लक्ष ठेवून होते.या मोहिमेत स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे मदत केली. कोणी बॅटरी पकडली, कोणी दोरखंड आणून दिला, तर कोणी पाण्याची व्यवस्था केली. अखेर रेस्क्यू टीमच्या कर्मचाऱ्याने मोठ्या चतुराईने खाली उतरून वासराच्या मानेला व पायाला दोरखंड बांधला आणि त्या निरागस जिवाला सुखरूप विहिरीबाहेर काढले.

माय-लेकराची भावनिक भेट आणि आजींचे अश्रू:

विहिरीतून बाहेर येताच घाबरलेले ते वासरू थेट आपल्या आईच्या (गाईच्या) कुशीत शिरले. आपल्या पाडसाला सुखरूप पाहून गाईनेही त्याला चाटायला सुरुवात केली. हे हृदयस्पर्शी दृश्य पाहून उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. वासराचे प्राण वाचल्याचे पाहून खोत आजींना आपला आनंद अश्रूंच्या रूपात अनावर झाला. त्यांनी शहर प्रमुख श्री. प्रशांत साळुंखे आणि नगरपालिकेच्या सर्व धाडसी कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले.रत्नागिरीच्या नागरिकांनी आणि नवलाईनगर येथील रहिवाशांनी श्री. प्रशांत साळुंखे यांच्या जनसेवेतील तत्परतेचे आणि रेस्क्यू टीमच्या धाडसाचे तोंडभरून कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button