मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील गॅबियन वॉलचे काम अंतिम टप्प्यात; पावसाळ्यापूर्वी घाट अधिक सुरक्षित होणार


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण प्रकल्पांतर्गत चिपळूण परिसरातील रखडलेल्या कामांना आता वेग आला आहे. कोकणातील महत्त्वाच्या परशुराम घाटात सुरू असलेले गॅबियन वॉलचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, आगामी पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण करण्यासाठी प्रशासन आणि कंत्राटदार कंपनीकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
सुमारे साडेपाच किलोमीटर लांबीच्या या घाटात दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे वारंवार अडथळे निर्माण होत होते. घाटाच्या तोडफोडीनंतर अनेक तांत्रिक आणि नैसर्गिक अडचणी समोर आल्या. पावसाळ्यात दरडी कोसळल्याने संरक्षक भिंती धोक्यात आल्या होत्या. त्यामुळे केंद्र सरकारने उपाययोजना निश्चित करण्यासाठी टेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थेची नियुक्ती केली होती.
संस्थेने परशुराम घाटाचा सखोल अभ्यास करून डोंगर उतारांवर जाळी बसवणे आणि गॅबियन वॉल उभारण्याची शिफारस केली. त्यानुसार कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून हे काम हाती घेण्यात आले. गतवर्षी पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे नियोजन होते; मात्र मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कामात मोठा अडथळा निर्माण झाला. अर्धवट स्थितीतील गॅबियन वॉल कोसळल्याने काही काळ घाटात केवळ एकेरी वाहतूक सुरू ठेवावी लागली होती.
पावसाळ्यानंतर गॅबियन वॉलच्या रचनेत आवश्यक बदल करून पुन्हा कामाला गती देण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे पेण येथील अधिकारी पंकज गोसावी यांनी सांगितले की, पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पाण्याचा नैसर्गिक प्रवाह कायम राहावा यासाठी झरे आणि पाण्याच्या मार्गांवर पाईप टाकण्यात आले असून, त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुरळीत होणार आहे.
सध्या परशुराम घाटातील दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. उर्वरित कामेही वेळेत पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी महामार्ग सुरक्षित आणि सुरळीत करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि कंत्राटदार कंपनीने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button