
महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती अर्ज तात्काळ निकाली काढा- सहाय्यक आयुक्त समाज कल्याण दीपक घाटे
रत्नागिरी, दि. 25 ) : महाडीबीटी पोर्टलवर जिल्ह्यातील विविध शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज अद्यापही महाविद्यालय स्तरावर व विद्यार्थी स्तरावर प्रलंबित असल्यामुळे ते तात्काळ निकाली काढणे आवश्यक आहे. या अनुषंगाने प्रलंबित अर्जाचा आढावा घेण्यासाठी संबंधित स्तरावर विशेष बैठकांचे आयोजन करण्यात येत असून, प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण दीपक घाटे यांनी केले आहे.
महाडीबीटी पोर्टल व्हर्जन 2.0 अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे सन 2019-20 ते 2025-26 या कालावधीतील प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढण्याच्या सूचना समाज कल्याण विभागाने दिल्या आहेत. संबंधित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व इतर शैक्षणिक लाभ वेळेत मिळावेत यासाठी ही कार्यवाही बंधनकारक करण्यात आली आहे. समाज कल्याण आयुक्तालयाने दिलेल्या निर्देशानुसार राज्यभरात मोठ्या प्रमाणावर अर्ज संस्था व जिल्हास्तरावर प्रलंबित असल्याची बाब निदर्शनास आली आहे. केंद्र शासनामार्फत विद्यार्थ्यांच्या 60 टक्के केंद्र हिस्सा मंजुरीसाठी अर्ज स्वीकृतींची अंतिम मुदत 31 मे 2026 निश्चित करण्यात आली असून त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत डेटा स्वीकारला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यामुळे संबंधित अधिकारी, संस्था व महाविद्यालयांनी प्रलंबित अर्जाची पडताळणी करून विहित मुदतीत आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी. अन्यथा पात्र विद्यार्थी केंद्र शासनाच्या लाभापासून वंचित राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात येणार असल्याचा इशाराही समाज कल्याण विभागाने दिला आहे.




