
पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना ! स्कॉर्पियो ५०० फूट खोल दरीत कोसळली, कोकण दर्शन करून परतणाऱ्या ८ जणांचा जागीच मृत्यू
महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात आज, सोमवारी (ता. २५) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवाशांनी भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी खोल दरीमध्ये कोसळली.या गाडीमध्ये एकूण आठ व्यक्ती प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, या सर्वांचा मृत्यू झाला आहे.
रेस्क्यू टीम सदस्य सागर दाहिंबेकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. 25) पहाटे 3 च्या सुमारास या अपघाताची माहिती स्थानिक प्रशासनाला आणि मदतकार्य पथकांना मिळाली. माहिती मिळताच ‘सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था’ आणि ‘रेस्क्यू टीम’चे जवान, पोलीस तात्काळ आवश्यक साधनांसह घटनास्थळी रवाना झाले. घाटातील अंधार आणि दुर्गम भागाचा सामना करत पथकाकडून दरीत उतरून प्रवाशांचा शोध घेण्याचे व बचाव कार्य करण्याचे काम वेगाने सुरू केले.
रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त गाडी स्कॉर्पिओ असून तिचा क्रमांक MH 11 DN 2340 असा आहे. या गाडीतील सर्व प्रवासी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी आहेत.गाडीतील प्रवाशांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. महेश अनिल पवार (वय २५ वर्षे, रा. आसगाव, ता. कोरेगाव), आदित्य अशोक साळुंखे (वय २१ वर्षे, रा. आसगाव, ता. कोरेगाव), रितेश राजेंद्र लोखंडे (वय २५ वर्षे, रा. आसगाव, ता. कोरेगाव), सुहास जितेंद्र लोखंडे (वय २० वर्षे, रा. आसगाव, ता. कोरेगाव), अंश समीर चव्हाण (वय १८ वर्षे, रा. आसगाव, ता. कोरेगाव), उत्कर्ष आनंद शिंगटे (वय २१ वर्षे, रा. आसगाव, ता. कोरेगाव), अनिल अभिमन्यू शिंगटे (वय २५ वर्षे, रा. आसगाव, ता. कोरेगाव), नितीन किसन नायकोंडे (वय ३५ वर्षे, रा. आसगाव, ता. कोरेगाव)
प्राथमिक माहितीनुसार हे सर्वजण कोकणातील दापोली येथे फिरण्यासाठी गेले होते, मात्र परतताना भल्या पहाटे हा अपघात झाला. हा अपघात नेमका कशामुळे झाला, गाडीचा ताबा सुटला की अन्य काही कारण होते, याची माहिती अजून मिळालेली नातू. तसेच या अपघातात नेमकी किती जीवितहानी झाली आहे किंवा किती जण गंभीर जखमी आहेत, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.



