चिपळूण तालुक्यात ९० ग्रामपंचायतींची सरपंच पदे सर्वसाधारण

अनेक ठिकाणी चुरशीच्या लढतींचे संकेत

चिपळूण, :
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तहसील कार्यालयात तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील १३० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. या सोडतीनुसार तब्बल ९० ग्रामपंचायतींची सरपंच पदे सर्वसाधारण गटासाठी राखीव राहिल्याने अनेक गावांमध्ये चुरशीच्या लढती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित जागांची संख्या यावेळी कमी झाल्याने चिपळूण तालुक्यात तिसऱ्यांदा आरक्षण सोडत काढावी लागली. नव्या आरक्षणानुसार नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ३४ जागा निश्चित करण्यात आल्या असून खुल्या गटात एका जागेची वाढ झाली आहे.

अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी टेरव आणि वेहेळे ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या असून अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी डेरवण ग्रामपंचायतीचे आरक्षण निश्चित झाले आहे.

नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी देवखेरकी, कुशिवडे आणि नायशी यांसह १७ ग्रामपंचायतींची सरपंच पदे आरक्षित झाली आहेत. तर या प्रवर्गातील महिलांसाठी आसुर्डे, तिवरे आणि कादवड यांसारख्या १७ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण लागू झाले असून येगाव, आगवे आणि नांदगाव खुर्द या ग्रामपंचायती त्यामध्ये समाविष्ट आहेत.

चिपळूण, कुंभारली, पोफळी आणि रेहेळवैजी यांसारख्या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींची सरपंच पदे सर्वसाधारण गटासाठी खुली राहिल्याने स्थानिक राजकारणात मोठी चुरस निर्माण होण्याची चिन्हे आहेत. अनेक मातब्बर नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी मिळणार असल्याने गावपातळीवरील राजकीय समीकरणांना वेग आला आहे.

प्रशासनाकडून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांचे चित्र या आरक्षण सोडतीनंतर स्पष्ट झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button