
घरगुती गॅस कनेक्शनबाबत नियम अधिक कडक, पीएनजीमुळे एलपीजी कनेक्शन धोक्यात?
एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारत गॅस आणि एचपी गॅस या सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती गॅस कनेक्शनबाबत नियम अधिक कडक करण्यास सुरुवात केली आहे. ’नो ड्युएल गॅस कनेक्शन’ धोरणानुसार एकाच घरात पीएनजी आणि एलपीजी अशी दोन घरगुती गॅस सुविधा ठेवणार्या ग्राहकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही वर्षांत मोठ्या शहरांमध्ये पाईपद्वारे नैसर्गिक गॅस म्हणजेच पीएनजी सेवा मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. पीएनजी हा एलपीजीपेक्षा अधिक सुरक्षित, स्वस्त आणि सोयीस्कर पर्याय मानला जातो. त्यामुळे अनेक घरांनी पीएनजी सेवा स्वीकारली; मात्र जुन्या एलपीजी सिलिंडरचे कनेक्शन बंद केले नाही. सरकारच्या नियमानुसार एकाच पत्त्यावर दोन वेगवेगळी घरगुती गॅस कनेक्शन ठेवणे नियमबाह्य मानले जाते. यामुळे तेल कंपन्यांनी अशा ग्राहकांची पडताळणी मोहीम सुरू केली आहे.
ज्या ग्राहकांकडे पीएनजी आणि एलपीजी दोन्ही सुविधा आहेत, पण त्यांनी एलपीजी कनेक्शन सरेंडर केलेले नाही, अशा ग्राहकांचे कनेक्शन येत्या जून महिन्यापासून बंद केले जाऊ शकते. त्यामुळे ग्राहकांनी वेळेत गॅस एजन्सीकडे जाऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
www.konkantoday.com




