
खेड तालुक्यातील धामणंद काजूफाटा येथील नागझरी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
खेड तालुक्यातील धामणंद काजूफाटा येथील नागझरी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी घडली.या घटनेत एका १५ वर्षीय मुलीसह गुहागर तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृतांमध्ये लावण्या विजय पार्टे (वय १५, रा. साखर चौकीचीवाडी, ता. खेड), नितीन सूर्यकांत जाधव (वय ३८, रा. गिमवी, ता. गुहागर) आणि विराज किशोर जाधव (वय १२, रा. गिमवी, ता. गुहागर) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार दि. १८ मे २०२६ रोजी दुपारी साडेतीन ते सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हे तिघे धामणंद काजूफाटा परिसरातील नागझरी नदीच्या डोहात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, नदीच्या पात्रातील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अचूक अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले. काही वेळातच ही घटना परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आली. स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले, मात्र तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता.




