१३ वर्षांच्या शाळकरी मुलीवर मातृत्त्व लादणाऱ्या आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी, लाख रुपये दंड,चिपळूण विशेष न्यायालयाच्या जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी ठोठावली शिक्षा


चिपळूण तालुक्यातील एका १३ वर्षांच्या शाळकरी मुलीवर बलात्कार करून जीवे ठार मारण्याची धमकी देणारा आरोपी वैभव सुरेश पालशेतकर (वय – 37 वर्षे, राहणार चिपळूण) याला चिपळूण येथील विशेष न्यायालयाच्या जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी 20 वर्षे सक्तमजुरी व 1 लाख रुपये दंडाची शिक्षा आज सुनावली.
आरोपी वैभव पालशेतकर याने मार्च २०१९ मध्ये संध्याकाळी ६ वा. च्या सुमारास गावात साखर आणण्यासाठी जात असलेल्या शाळकरी मुलीला निर्जन पुलावर अडविले. आरोपीने तिचा हात पकडून तिला जबरदस्तीने बाजुच्या गवतात घेवून गेला. त्याठिकाणी त्याने तिचे तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. तसेच बलात्कार करुन झाल्यानंतर ही घटना कोणालाही सांगितल्यास तिला मारुन टाकण्याची धमकी दिली. भीतीपोटी दुर्दैवी मुलीने ही घटना कोणालाच सांगितली नाही. परंतु, जुलै २०१९ मध्ये पीडित मुलीस तिच्या आईने मुलीची तब्येत जाड वाटत असल्याने चिपळूण येथील हॉस्पीटलमध्ये तपासणीसाठी नेले. तेथील डॉक्टरांनी मुलीची सोनोग्राफी करावी लागेल, असे सांगितले.
पीडित मुलीला तिच्या आईने अश्विनी हॉस्पीटल मुंबई येथे नेले. सोनोग्राफीमध्ये पीडित मुलगी १९ आठवड्याची गरोदर आढळून आली. पीडितेच्या आईने पीडित मुलीस विश्वासत घेऊन विचारणा केली असता, तिने आरोपी वैभव पालशेतकर यांने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना सांगितली.
पीडितेच्या आईने तात्काळ कफ परेड पोलीस ठाणे मुंबई येथे तक्रार दिली. परंतु, गुन्हा चिपळूण पोलीस ठाणे च्या हद्दीत घडलेला असल्यामुळे तो चिपळूण पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. त्यानंतर चिपळूण पोलीसांनी सखोल तपास करुन आरोपी विरुध्द भा.द.वि. कलम ३७६ (३), ५०६ तसेच पोक्सो कायदा कलम ४, ६, ८, १२ अन्वये चिपळुण येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
खटल्याची सुनावणी चिपळूण येथील विशेष न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांच्यासमोर सुरु झाली. गुन्हा शाबीत करण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता अनुपमा ठाकुर यांनी सरकार पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदारांची महत्‍त्वपूर्ण साक्ष अभिलेखावर आणली. त्या अनुषंगाने प्रभावी युक्तीवाद केला.
पुराव्याअंती विशेष न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य धरुन 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर मातृत्त्व लादणारा नराधम आरोपी वैभव पालशेतकर याला भा.द.वि. कलम ३७६ (३), ५०६ पोक्सो कायदा कलम ४, ६, ८,१२ अन्वये दोषी ठरवून २० वर्ष सक्तमजुरी व १ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
दंड न भरल्यास १ वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश केले. या निकालामुळे दुर्दैवी मुलीच्या आईने न्याय मिळाल्याबद्दल भावना व्यक्त केली. हा निकाल म्हणजे समाजातील घृणास्पद गुन्हे करणा-या आरोपींना बसलेली चपराक आहे, अशी प्रतिक्रिया सर्व स्तरावर व्यक्त होत आहे.
सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी अभियोक्ता अनुपमा ठाकूर यांनी काम पाहिले. तसेच पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेड कॉस्टेबल विनायक चव्हाण यांनी काम पाहिले. गुन्ह्याचे तपास काम कफ परेड पोलीस ठाणे येथील सहायक पोलीस निरीक्षक वर्षा शिंदे यांनी केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button