धुम्रपानामुळे केवळ फुफ्फुसावर नाही तर मेंदुवरही होतो परिणाम!, मनोभ्रंशाचा (डिमेन्शिया) धोक्यात लक्षणीय वाढ.!

मुंबई : धूम्रपानाचे दुष्परिणाम फक्त फुफ्फुसांपुरते मर्यादित नसून ते थेट मेंदूवरही परिणाम करत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष नव्या अभ्यासातून समोर आला आहे. संशोधकांनी फुफ्फुस आणि मेंदू यांच्यातील एक महत्त्वाचा जैविक दुवा उघड केला असून या ‘लंग-ब्रेन लिंक’मुळे मनोभ्रंशाचा (डिमेन्शिया) धोका लक्षणीयरीत्या वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

धूम्रपानाचे दुष्परिणाम केवळ फुफ्फुसांपुरते मर्यादित नसून ते थेट मेंदूवरही परिणाम करत असल्याचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष ‘अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो’ येथे झालेल्या नव्या संशोधनातून समोर आला आहे. या अभ्यासात धूम्रपान आणि मनोभ्रंश (डिमेन्शिया) यामधील संबंध स्पष्ट करताना ‘लंग-ब्रेन लिंक’ नावाचा एक महत्त्वाचा जैविक दुवा उघड झाला आहे.हा अभ्यास सायन्स ॲडव्हान्सेस या प्रतिष्ठित जर्नलमध्ये एप्रिल २०२६ मध्ये प्रसिद्ध झाला असून जोसी चेन यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या पथकाने तो केला आहे. या संशोधनात अभिमन्यू ठाकूर व कूझेंग यांचाही सहभाग होता.

या अभ्यासानुसार सिगारेटमधील निकोटीन शरीरात प्रवेश केल्यानंतर फुफ्फुसांतील ‘पल्मोनरी न्यूरोएंडोक्राइन सेल्स’ सक्रिय होतात. या पेशी अत्यंत सूक्ष्म असल्या तरी त्या बाह्य रसायनांना ओळखून शरीरात संदेश पाठवण्याचे काम करतात. निकोटीनच्या प्रभावाखाली या पेशी ‘एक्सोसोम्स’ नावाचे सूक्ष्म कण तयार करतात.

हे कण रक्तप्रवाहातून मेंदूपर्यंत पोहोचतात आणि मेंदूतील रासायनिक संतुलन बिघडवतात.विशेषतः, हे कण मेंदूतील लोह (आयर्न) पातळीवर परिणाम करतात. लोहाचे असंतुलन हे अल्झायमर आणि इतर न्यूरोडीजेनेरेटिव्ह आजारांशी संबंधित असल्याचे यापूर्वीच्या संशोधनातूनही स्पष्ट झाले आहे. परिणामी, मेंदूतील पेशींवर ताण वाढतो, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होतो आणि हळूहळू न्यूरॉन्सचे नुकसान होऊ लागते. ही प्रक्रिया दीर्घकाळ शांतपणे सुरू राहते आणि नंतर मनोभ्रंशाच्या रूपाने समोर येऊ शकते.

संशोधनातील महत्त्वाची बाब म्हणजे धूम्रपानाचे प्रमाण कमी असले तरी धोका टळत नाही. अधूनमधून सिगारेट ओढणेही सुरक्षित नाही, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. अगदी कमी प्रमाणात निकोटीन शरीरात गेल्यासही पल्मोनरी न्यूरोएंडोक्राइन सेल्स सक्रिय होऊन मेंदूपर्यंत हानिकारक संकेत पोहोचवू शकतात.याआधीच्या अभ्यासांमध्येही धूम्रपानामुळे मेंदूचा आकार कमी होणे, स्मरणशक्तीवर परिणाम होणे आणि वृद्धत्वाची गती वाढणे यांसारखे परिणाम आढळले आहेत. मात्र या नव्या संशोधनाने प्रथमच फुफ्फुस आणि मेंदू यांच्यातील थेट जैविक संबंध उघड केला आहे. त्यामुळे धूम्रपान आणि मनोभ्रंश यामधील नात्याला अधिक ठोस वैज्ञानिक आधार मिळाला आहे.

जागतिक स्तरावर मनोभ्रंश हा झपाट्याने वाढणारा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न ठरत आहे. वाढती आयुर्मर्यादा आणि बदलती जीवनशैली यामुळे या आजाराचे प्रमाण वाढत असताना, धूम्रपान हा त्यामागील एक महत्त्वाचा धोका म्हणून पुढे येत आहे. त्यामुळे आरोग्य धोरणांमध्ये धूम्रपानविरोधी उपाययोजना अधिक कडक करण्याची गरज अधोरेखित होत आहे.तज्ज्ञांच्या मते, धूम्रपान सोडणे हेच मेंदू आणि शरीराच्या आरोग्यासाठी सर्वात प्रभावी पाऊल आहे.

धूम्रपानाचा परिणाम केवळ श्वसनसंस्थेपुरता मर्यादित नसून तो मेंदूच्या कार्यक्षमतेवरही खोलवर परिणाम करतो असा इशारा त्यांनी दिला आहे.एकूणच या संशोधनामुळे धूम्रपानाचे दुष्परिणाम अधिक व्यापक असल्याचे स्पष्ट झाले आहे. फुफ्फुस आणि मेंदू यांच्यातील या नव्या दुव्यामुळे मनोभ्रंशासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो ही बाब लक्षात घेता धूम्रपानापासून दूर राहणे आणि त्याविरोधातील जनजागृती वाढवणे अत्यावश्यक ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button