डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मस्कत येथे उत्साहात साजरी

आबलोली. : भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भारतीय दूतावास, मस्कत येथे डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन, ओमान यांच्या वतीने नुकताच एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विविध मान्यवर, समाजातील सदस्य, शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला अभिवादन केले.
कार्यक्रमाची सुरुवात ओमानमधील भारताचे राजदूत जी. व्ही. श्रीनिवास यांचे स्वागत करून करण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलन व राष्ट्रगीत सादर करण्यात आले. यानंतर डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन ओमानमधील विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचन करून उपस्थितांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात आशिषकुमार येसंकर यांनी कार्यक्रमाचे महत्त्व आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा समाजावर झालेला प्रभाव स्पष्ट केला.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणून विविध भारतीय शाळांतील विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे सादर केली. इंडियन स्कूल अल सीब येथील अनेल नेल्सन डिसोझा यांनी ‘आजच्या जगातील समता’ या विषयावर भाष्य केले. इंडियन स्कूल अल वादी अल कबीर येथील अनिका संतोष यांनी ‘संविधान आणि माझे अधिकार’ या विषयावर विचार मांडले, तर इंडियन स्कूल अल घुब्रा येथील अदिवा भदोरिया यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मला का प्रेरणा देतात”’ या विषयावर प्रेरणादायी भाषण केले. कार्यक्रमात इंडियन स्कूल मस्कतच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या समूह नृत्याने उपस्थितांची विशेष दाद मिळवली आणि कार्यक्रमात रंगत आली.

प्रमुख वक्त्या म्हणून इंडियन स्कूल सोहारच्या प्राचार्या संचिता वर्मा यांनी समता, शिक्षण आणि सक्षमीकरण यांचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांना प्रेरणा दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी सहभागींचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मृणाल किर्लोस्कर यांनी केले. आभार प्रदर्शन संदीप मोहिते यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button