टीमवर्क आणि देशभक्तीच यशाची गुरुकिल्ली : डॉ. अनिल काकोडकर

चतुरंग विद्यार्थी संमेलनात विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन

चिपळूण : देशहिताच्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये गोपनीयता हीच सर्वात मोठी ताकद असते. अणुचाचणीसारख्या मोहिमांमध्ये सहभागी होताना व्यक्तींचे व्यक्तिगत मोठेपण, पद, अहंकार हे सर्व गळून पडते आणि देशभक्ती हेच एकमेव ध्येय उरते. जेव्हा ध्येय स्पष्ट असते, तेव्हा छोटे-मोठे मतभेद, वाद आणि अडथळे आपोआप बाजूला पडतात; अन्यथा अशा प्रकारची ऐतिहासिक कामगिरी शक्यच झाली नसती, असे ठाम प्रतिपादन पद्मभूषण अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.

चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ‘कोकण अभ्यासवर्ग विद्यार्थी संमेलन’ शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे उत्साहात सुरू आहे. या संमेलनाच्या पहिल्याच दिवशी डॉ. अनिल काकोडकर यांची विशेष मुलाखत ज्ञानप्रबोधिनीचे आदित्य शिंदे यांनी घेतली. ‘पोखरण अणुचाचणी’ या विषयावर केंद्रित या संवादातून विद्यार्थ्यांना विज्ञान, राष्ट्रनिष्ठा आणि नेतृत्व यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.

भारताच्या अणुचाचण्यांबाबत सविस्तर बोलताना डॉ. अनिल काकोडकर यांनी सांगितले की, अणुचाचणी करणे म्हणजे केवळ वैज्ञानिक प्रयोग नव्हे, तर अत्यंत संवेदनशील, उच्चस्तरीय आणि बहुआयामी आव्हानांचा सामना करणारी राष्ट्रीय मोहीम असते. पोखरण अणुचाचणी दरम्यान काम करताना प्रत्येक टप्प्यावर अचूकता, गोपनीयता आणि समन्वय यांचा कस लागला.

विशेषतः अमेरिकन गुप्तहेर उपग्रहांचे सतत लक्ष भारतावर असल्यामुळे काम अधिकच कठीण झाले होते. उपग्रह ठराविक वेळेला त्या परिसरावरून जात असत. त्यामुळे त्या वेळेत कोणताही संशय येऊ नये, यासाठी परिसरातील सर्व हालचाली पूर्णपणे ‘नॉर्मल’ ठेवाव्या लागत. एक दिवस आधी जशी परिस्थिती होती, तशीच दुसऱ्या दिवशीही दिसावी यासाठी अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात येत असे.

राजस्थानमधील प्रचंड उष्णतेत, सुमारे ५१ अंश सेल्सिअस तापमानात, शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी काम केले. अशा प्रतिकूल परिस्थितीतही शिस्त, संयम आणि राष्ट्रनिष्ठा यांच्या बळावर ही मोहीम यशस्वी झाली, असे त्यांनी नमूद केले.

देशाच्या विकासासाठी अणुऊर्जा अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. वीज निर्मिती, औद्योगिक प्रगती आणि तंत्रज्ञान विकासासाठी अणुक्षमता असणे ही काळाची गरज आहे. आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानात स्वयंपूर्णता आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

संवादादरम्यान डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासोबतचा एक प्रेरणादायी अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितला. ‘पृथ्वी’ क्षेपणास्त्र प्रकल्प सुरू असताना ते पाहणीसाठी गेले असता, त्यांना वाटले की प्रकल्पप्रमुख म्हणून कलाम सहज ओळखू येतील. मात्र ते इतर सहकाऱ्यांमध्ये पूर्णपणे मिसळून काम करत होते. शेवटी माझ्या सहकाऱ्याला विचारल्यावरच कलाम कोण आहेत, हे लक्षात आले. यावरून त्यांनी एक महत्त्वाचा धडा अधोरेखित केला, खरा नेता तोच, जो स्वतःला वेगळा दाखवत नाही, तर टीमचा एक भाग बनतो. अशा नेतृत्वातूनच मोठ्या मोहिमा यशस्वी होतात.

तरुण पिढीला मार्गदर्शन करताना डॉ. अनिल काकोडकर यांनी शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टींना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. देशाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर ग्रामीण आणि शहरी भागामध्ये समतोल राखणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

‘वर्क फ्रॉम होऊ शकते, तर वर्क फ्रॉम व्हिलेज का नाही?’ असा विचारप्रवर्तक प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ग्रामीण भागातही संधी निर्माण केल्यास शहरांकडे होणारे स्थलांतर कमी होईल आणि गावांचा विकास वेगाने होईल, असे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला चिपळूण नगर परिषदेचे माजी मुख्याधिकारी विशाल भोसले, दैनिक ‘सागर’च्या संपादिका शुभदा जोशी, नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर , विचारवंत डॉ. सागर देशपांडे, निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी या संमेलनाला उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निबंध कानिटकर यांनी प्रभावीपणे केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button