
रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याच्या वतीने रेल्वे स्थानकात जीवन रक्षा अभियान

रत्नागिरी : रेल्वे पोलीस ठाण्याच्या वतीने आज (१७ जून) जीवन रक्षा अभियान सकाळी ९ ते ११ यावेळेत रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे राबविण्यात आले. या अभियानादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे यांनी या अभियानास भेट देऊन यात सहभागी होत राबविलेल्या संकल्पनेचे त्यांनी कौतुक केले व अभियानास शुभेच्छा दिल्या.
मुंबई रेल्वे आयुक्तालय अंतर्गत गेल्या काही वर्षांत मुंबई रेल्वे प्रवासा दरम्यान अनेक रेल्वे प्रवासी रेल्वे ट्रॅक क्रॉसिंग करताना/घाई-घाईत गाडीत चढणे किंवा उतरत असताना रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडतात व अनेक प्रवासी जखमी होऊन कायमचे अपंगत्व येण्यासारख्या बऱ्याच घटना घडतात. त्याअनुषंगाने लोहमार्ग (मुंबई) पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून मुंबई रेल्वे पोलिस आयुक्तालयात “जीवन रक्षा अभियान” राबविण्याची संकल्पना हाती घेतली. त्या पार्श्वभूमीवर आज (१७ जून) रोजी जीवन रक्षा अभियान रत्नागिरी रेल्वे स्थानकात राबविण्यात आले.
याप्रसंगी रेल्वे पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण पाडवी, उपनिरीक्षक रवीकुमार पाटील, डब्ल्यूपीएसआय आश्विनी धापसे, संगिता लोंढे, स्टेशन अधीक्षक श्री. कोवे, रेल्वे सुरक्षा बलचे प्रभारी निरीक्षक सतीश विधाते, कमर्शियल अधिकारी श्रीमती शुभदा देसाई, तसेच अंमलदार व होमगार्ड जवान उपस्थित होते.




