दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत न केल्यास तीव्र आंदोलन करणार! मनसेच्या शिष्ट मंडळाने घेतली रेल्वे अधिकार्‍यांची भेट!!


मुंबई : दादर-रत्नागिरी पॅसेंजर कायमची बंद करण्यात आली असून त्याजागी आता दादर-गोरखपूर एक्सप्रेस सुरू केली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण मुंबई आणि कोकणवासियांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. याविरोधात मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वे अधिकाऱ्यांची भेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी भेट घेतली.

मागील काही काळापासून राज्यांतर्गत रेल्वेगाड्या रद्द करून परराज्यातील रेल्वेगाड्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. करोना काळात मुंबई – कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस, मुंबई – मनमाड गोदावरी एक्स्प्रेस, पुणे – भुसावळ पॅसेंजर, पंढरपूर एक्स्प्रेस यांसारख्या असंख्य रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. ज्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आल्याच नाहीत. त्या वेळापत्रकात आता परराज्यात जाणाऱ्या गाड्या सोडण्यात येत आहेत.

राज्यांतर्गत रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्यामुळे राज्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यातच आता पुन्हा दादर-रत्नागिरी गाडी रद्द करण्यात आली असून त्याजागी दादर – गोरखपूर रेल्वेगाडी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने कोकणात प्रवास करणाऱ्या मुंबईकर व कोकण वासियांची फार मोठी गैरसोय होत आहे. कोकण वासियांना व राज्यातील जनतेला डावलून परराज्यातील प्रवाशांना प्राधान्य देणे हा दूजाभाव रेल्वे प्रशासनाकडून वारंवार केला जात असून त्याचा निषेध करतो. या सर्व प्रकारामुळे राज्यातील जनतेत प्रचंड नाराजी व असंतोष पसरला आहे.

दादर – रत्नागिरी पॅसेंजर गाडी पूर्ववत दादर स्थानक येथून सुरू करावी. तसेच याआधी रद्द केलेल्या इतरही रेल्वेगाड्या पुन्हा सुरू करण्यात याव्यात. अन्यथा स्थानिक जनतेच्या असंतोषाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. मध्य रेल्वे प्रशासनाने याची तत्काळ दखल घेऊन कोकणवासियांना दिलासा द्यावा, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मांडण्यात आली. नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, संदीप देशपांडे, मनसे रेल्वे कर्मचारी सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, मनसे उपाध्यक्ष योगेश सावंत यांच्या शिष्टमंडळाने रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button