
मुंबई-गोवा महामार्ग १७ वर्षे रखडला म्हणून प्रामाणिकपणे आंदोलन करणार्या आंदोलकांवरच गुन्हे दाखल
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, या मागणीसाठी विनापरवाना मोर्चा काढून रस्ता रोको आंदोलन करणार्या आंदोलकांविरोधात संगमेश्वर येथील ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी सोनवी पूल परिसरात आंदोलन सुरू होते. आंदोलकांनी पारेख पेट्रोलपंप ते संगमेश्वर एसटी स्टँड आणि सोनवी पूल या दरम्यान मोर्चा काढत प्रतिकात्मक शवयात्रा काढली. तसेच शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली असून पोलीस यंत्रणेवर मोठा ताण आला होता.
याप्रकरणी संगेमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ०३/२०२६ अन्यवे भारतीय न्याय संहिता कलम १२६ (२), १८९, १९० तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अंतर्गत कशोक जाधव, युयुत्सु आर्ते, सुरेंद्र पवार, रूपेश दुर्गे, अनिकेत मेस्त्री, संजय जंगम यांच्यासह इतर अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विनापरवाना मोर्चा काढणे व सार्वजनिक वाहनांच्या व्यवस्थेत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून याबाबत फिर्याद पोलीस हवालदार किशोर महादेव जोशी यांनी नोंदविली आहे.www.konkantoday.com




