अंतराळ संशोधन व उपग्रह प्रक्षेपण प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गतगुरुवारी भाट्ये बीचवर हाय अल्टीट्युट बलुनचे प्रक्षेपण


रत्नागिरी, दि. २५ ) : विद्यार्थ्यांसाठी दि. २३ ते २६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत अंतराळ संशोधन व उपग्रह प्रक्षेपण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे High Altitude Balloon (HAB) चे प्रत्यक्ष प्रक्षेपण. हे प्रक्षेपण दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता, भाट्ये बीच, रत्नागिरी येथे होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना फुग्याचे प्रक्षेपण, ट्रॅकिंग, वैज्ञानिक डेटा संकलन तसेच डेटा पुनर्प्राप्ती प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे, असे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे आणि शिक्षणविषयक सकारात्मक भूमिकेमुळे गेल्या चार वर्षात जिल्हा परिषद शाळांमधील तब्बल ५० ग्रामीण विद्यार्थ्यांना NASA व ISRO येथे शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी पाठविण्यात आले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाच्या संधी मिळाव्यात, या हेतूने मंत्री महोदयांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी पालकमंत्री महोदयांच्या विशेष पुढाकारातून CSR (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पुढील टप्पा – अंतराळ संशोधनाकडे भक्कम वाटचाल

विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासदौरेच नव्हे तर प्रत्यक्ष तांत्रिक अनुभव मिळावा, या उद्देशाने पुढील टप्पा म्हणून या अंतराळ संशोधन व उपग्रह प्रक्षेपण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या टप्प्यात High Altitude Balloon (HAB) Launch सारख्या अत्याधुनिक वैज्ञानिक उपक्रमाचा समावेश करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रक्षेपण, ट्रॅकिंग व डेटा विश्लेषणाचा अनुभव देण्यात येत आहे. पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या विशेष मार्गदर्शनामुळे, सातत्यपूर्ण पाठबळामुळे आणि CSR निधी उपलब्ध करून दिल्यामुळे हा उपग्रह / लाँच कार्यक्रम अत्यंत भव्य व यशस्वी स्वरूपात साकार झाला असून, तो ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी नवे क्षितिज खुले करणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

दिनांक २३ ते २६ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानाची मूलतत्त्वे, उपग्रह प्रणाली, कक्षीय रचना, सेन्सर इंटिग्रेशन, उपग्रह मॉडेलिंग, पेलोड इंटिग्रेशन तसेच डेटा संकलन याबाबत सैद्धांतिक व प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येत आहे. या कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे High Altitude Balloon (HAB) चे प्रत्यक्ष प्रक्षेपण. हे प्रक्षेपण दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता, भाट्ये बीच, रत्नागिरी येथे होणार असून, यावेळी विद्यार्थ्यांना फुग्याचे प्रक्षेपण, ट्रॅकिंग, वैज्ञानिक डेटा संकलन तसेच डेटा पुनर्प्राप्ती प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे.

ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या विज्ञान-तंत्रज्ञानाची दारे उघडून देणारा हा उपक्रम त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवी दिशा देणारा ठरणार आहे, तसेच जिल्हा परिषद रत्नागिरी व सहभागी संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांचा हा उपक्रम राज्यातील इतर जिल्ह्यांसाठीही आदर्श ठरणार आहे.

जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या पुढाकारातून तसेच सिलिकॉन टेकहिल्स रिसर्च फाउंडेशन, सातारा आणि गृहा स्पेस, बेंगळुरू यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत विविध तालुक्यांतील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी चार दिवसीय अंतराळ विज्ञान व उपग्रह तंत्रज्ञान विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अशा स्वरूपाचा हा महाराष्ट्रातील पहिल्यावहिला उपक्रम असून, तो राज्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणार आहे.

000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button