लोकल टू ग्लोबल’ पर्यटनाचे नियोजन एकाच छताखाली होण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमान कंपन्यांच्या मनमानी दरवाढीवर नियंत्रण आणण्याची मागणी


पुणे : भारतात मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळे असून त्यांचा विकास व्हावा देशांतगर्त पर्यटनाला चालना मिळावी तसेच कोकणापासून कॅलिफोर्नियापर्यंत म्हणजे ‘लोकल टू ग्लोबल’ पर्यटनाचे नियोजन एकाच छताखाली होण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमान कंपन्यांच्या मनमानी दरवाढीवर नियंत्रण आणण्याची मागणी भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेच्या वतीने करण्यात आली. दरम्यान, विमान कंपन्यांच्या आडून लूट करणाऱ्यांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे संचालक प्रवीण घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विमान कंपन्यांच्या काळानुरूप बदलते शुल्क जिकरीचे ठरत आहे. या कंपन्या मनमानीप्रमाणे प्रवासाचे दर आकारत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळावर जाण्यासाठी थेट विमानसेवा नसल्याने विमान प्रवास बदलत (उदा. पुणे ते मुंबई, दिल्ली, चेन्नई) या ठिकाणांवरून पुढे मार्गस्थ व्हावे लागत आहे. मात्र तेवढ्या प्रवासासाठी विमान कंपन्यांकडून अवाजवी शुल्क आकारले जात आहे.

तसेच पुढील विमानप्रवास खर्च आणि पर्यटनासाठी असलेल्या सामुहीक (पॅकेज) सहलीचे दर पर्यटकांच्या अवाक्याबाहेर जात आहेत. विशेषतः आंतरराष्ट्रीय स्थळावरील पर्यटनासाठी चार दिवसांसाठी गेल्यानंतर राहणे, खाणे-फिरणे यासहीत जेवढा खर्च येत नाही, त्यापेक्षा अधिक खर्च विमान प्रवासासाठी आकारला जात आहे, असे घोरपडे यांनी सांगितले.

तसेच कुलकर्णी म्हणाले, ‘विमान कंपन्यांच्या या मक्तेदारीवर नियंत्रण आणणे महत्वाचे आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार चाचपणी करून विमान कंपन्या चढ्या दरानुसार कंपन्या प्रवासाचे शुल्क आकारत आहे. चार महिने आगाऊ आरक्षण केल्यासही तेवढाच दर आकारला जात असल्याने पर्यटकांना आणि पर्यटन सेवा कंपन्यांनाही हा खर्च अवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे फ्लाय ९५ या विमानतळासारखी सेवा किंवा प्रत्येक विमानातील पहिले २० ते ३० तिकिटांचे शुल्क ठरवून दिलेल्या दरापेक्षा जादा आकारले जाऊ नये, अशी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मागणी करण्यात येणार आहे.’

विमान कंपन्यांसाठी अशा सूचना किंवा दर वाढीबाबत नियंत्रण प्रणाली व्यवस्थापन झाले, तर नक्कीच लोकल ते ग्लोबल पर्यटनाला चालना मिळेल. तसेच परिसर आणि पर्यटन विकास होऊन स्थानिक पातळीवर रोजगार, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे मतही यावेळी सदस्यांनी व्यक्त केले.

पुणे पर्यटन महोत्सव

महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विकासासाठी भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेच्या वतीने तीन दिवसीय ‘पुणे पर्यटन महोत्सव’ अर्थात ‘पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल’चे आयोजन करण्यात आले आहे. १६ ते १८ जानेवारी रोजी हाॅटेल सेंट्रल पार्क येथे हा महोत्सवात व्यावसायिक पर्यटन आणि विस्तारीकरण समेट, काश्मीर टुरिझम, मानसरोवर, महाराष्ट्र टुरिझम आदी विषयांवर चर्चासत्र होणार आहे. महोत्सवासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सचलनालय, पुणे विमानतळ, पुणे रेल्वे स्थानक, पारपत्र कार्यालय, पीएमपीएमएल, पर्यटन मंत्रालय, मेट्रो आदी विभागांचा सहभाग असणार आहे, अशी घोरपडे यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button